Raj Thackeray: 'मधु इथे अन् चंद्र तिथे', राणा विरुद्ध शिवसेना भांडणावर राज ठाकरेंनी साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 12:03 PM2022-05-22T12:03:11+5:302022-05-22T12:03:28+5:30
मुंबईतील मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा आग्रह त्या राणा दाम्पत्याने केला होता
पुणे - मनसेप्रमुखराज ठाकरे यांची तोफ आज पुण्यात धडाडली. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात या केवळ 2.5 ते 3 हजार प्रेक्षक संख्या असलेल्या सभागृहात ही सभा पार पडली. राज ठाकरेंचं सकाळी 11.23 वाजता मंचावर आगमन, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून कार्यक्रमास सुरुवात झाली. राज ठाकरेंचा सत्कार होताच, त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. अपेक्षेप्रमाणे आणि राज ठाकरेंनी जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी अयोध्या दौऱ्या रद्द करण्याचे कारण या सभेत सांगितले. तसेच, काही टिकाकारांचा समाचारही घेतला. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन राणा विरुद्ध शिवसेना यांच्यातील वादावरही भाष्य केलं.
मुंबईतील मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा आग्रह त्या राणा दाम्पत्याने केला होता. अर्रे मातोश्री म्हणजे काय मशिद आहे का, असे म्हणत राज ठाकरेंनी राणा दाम्पत्याला फटकारले. तसेच, राणा विरुद्ध शिवेसना यांच्यात झालेल्या शाब्दीक युद्धावरुन, अटकेच्या प्रकरणावरुन, हिंदुत्त्वावरुन आणि लडाखमधील गोड भेटीवरुन शिवसेना आणि राणा दाम्पत्यावर टिका केली. शिवसेनेनं मोठा विरोध केला, राणा दाम्पत्यास मग अटक झाली. अटकेनंतर मधु इथं आणि चंद्र तिथं असं आपल्याला पाहिलं मिळाला. एवढा मोठं आंदोलन नाट्य झालं आणि ते तिथं लडाखमध्ये हातात हात घालून फिरतात. ते तिथं एकाच पंगतीत जेवतात, असे म्हणत राज ठाकरेंनी हे सगळे नाटकं करत असल्याचं म्हटलं.
अयोध्या दौऱ्यावरही दिलं स्पष्टीकरण
“अयोध्या दौरा रद्द म्हटल्यावर अनेकांना वाईट वाटलं, अनेकांना आनंद झाला. म्हणून मी दोन दिवसांचा बफर दिला होता. जे बोलायचंय ते बोलून घ्या. अयोध्येला जाणार याची घोषणा सुरू केली होती. त्यानंतर हे प्रकरण सुरू झालं. काय चाललंय हे मी पाहत होतं. मला मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेशातून लोक माहिती देत होते. एक वेळ आली तेव्हा मला हा सापळा असल्याचं लक्षात आलं. यात अडकलं नाही पाहिजे असं वाटलं. या सगळ्याची सुरूवात रसद पुरवली गेली ती महाराष्ट्रातून झाली. हा पुन्हा विषय बाहेर काढा असं सांगण्यात आलं. माझी अयोध्या वारी खुपली असे बरेच जण होते” असं मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. पुण्यात आयोजित केलेल्या सभेदरम्यान त्यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याबाबत वक्तव्य केलं.
पुण्यात होणाऱ्या या सभेआधी राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. त्यानंतर, राज ठाकरे यांनी दौरा रद्द केल्याची घोषणा केली. गेले काही दिवसांपासून राज्य सरकार राज ठाकरेंच्या निशाण्यावर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनेच्या सभेत राज ठाकरेंना मुन्नाभाई संबोधत निशाणा साधला होता. त्यामुळे आजच्या सभेत राज ठाकरे यांच्या निशाण्यावर प्रामुख्यानं राज्य सरकार, भाजप सरकार बृजभूषण सिंह आणि अयोध्या दौऱ्यावरच बोलतील, अशी अनेकांना अपेक्षा होती. दरम्यान, मनसैनिकांनी सभागृहाबाहेरुन सभा स्क्रीनवर पाहिली.
दरम्यान, राज यांच्या पुण्यातील सभेसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी फलक लावून वातावरण निर्मिती केली होती. या सभेला पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते उपस्थित राहिले. त्यामुळे पोलिसांकडून रविवारी सकाळपासून स्वारगेट परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.