Join us

राज ठाकरेंनी घेतली CM शिंदेंची भेट; टोल नाक्यांचा प्रश्न अन् दुकानांवरील मराठी पाट्यांबाबत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2023 12:16 PM

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

मुंबई: मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत राज्यातील टोल नाक्यांचा प्रश्न आणि दुकानांवरील मराठी पाट्या लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आणि दंडात्मक कारवाईबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.  

सर्वोच्च न्यायालयाच्या दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. मराठी पाट्यांबाबतच्या निर्णयानंतर महापालिकेच्या वतीने दुकानांना आदेश देण्यात आले आहेत. दुकानदारांनी मराठी पाट्या लावाव्यात अन्यथा कारवाई केली जाईल असे आदेशात म्हंटले आहे. परंतु अजूनही काही दुकानदारांनी मराठी पाट्या न लावल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मनसेने न्यायालयाच्या आदेशानंतरही दुकांनावर मराठी पाट्या न लावणाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मुंबई, नवी मुंबई, पुणे यांसह राज्यातील अनेक ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकानांची तोडफोड केल्याचे समोर आले. तसेच काही दिवसांआधी टोल नाक्यावरुन देखील मनसेने आक्रमक पवित्रा घेतला होता. यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना अनेक आश्वासनं दिली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीतून आता पुढे काय निष्पन्न होणार? मनसे दुकानांवरील मराठी पाट्यांचा मुद्दा लावून धरणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ मध्ये मार्च २०२२ मध्ये सुधारणा केली. त्यामध्ये कलम ३६ क च्या तरतुदींनुसार दुकानांच्या पाट्या मराठी देवनागरी लिपीत, ठळक अक्षरात असणे बंधनकारक आहे. त्याचसोबत नामफलक हा इतर भाषेमध्येसुद्धा असू शकेल. पण, इतर भाषेतील नावापेक्षा मराठीतील नाव लहान ठेवता येणार नाही, असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. 

कारवाईनंतर सर्वोच्च न्यायालयात

मराठी नामफलकाच्या सक्तीननंतर निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पालिकेच्या दुकाने व आस्थापने विभागाने कार्यवाही सुरू केली होती. गेल्या वर्षी दुकाने व आस्थापनांना ३१ मेपर्यंत नामफलकाच्या पाट्या मराठी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, या विरोधात व्यापारी संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या बाजूने निर्णय देत २५ नोव्हेंबर २०२३पर्यंत दुकाने-आस्थापनांवरील पाट्या मराठीत करण्याचे आदेश दिले होते.

टॅग्स :एकनाथ शिंदेराज ठाकरेमनसेटोलनाकामहाराष्ट्र सरकार