मुंबई-
मुंबईतील रंगशारदामध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा आटोपल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लिलावती रुग्णालयात जाऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची भेट घेतली. नारायण राणे यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राणेंची प्रकृती आता स्थिर असल्याचं राणे कुटुंबीय आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे.
मोठी बातमी! नारायण राणे लिलावतीमध्ये दाखल; अँजिओप्लास्टीची शक्यता
दोनच दिवसांपूर्वी नारायण राणे रुटीन चेकअपसाठी लीलावती रुग्णालयात आले होते. त्यानंतर सर्व चाचण्या केल्यानंतर राणेंवर अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानुसार राणेंवर शस्त्रक्रिया करण्यात आली. राणेंवर झालेल्या शस्त्रक्रियेची माहिती राज ठाकरे यांना मिळताच त्यांनी आजचा मनसेचा मेळावा झाल्यानंतर लीलावती रुग्णालय गाठलं. राज ठाकरेंनी राणेंच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर ते 'शिवतीर्थ' या त्यांच्या निवासस्थानी रवाना झाले.
केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांना हा त्रास आधीपासूनच असल्याची माहिती समोर आली आहे. याआधीही त्यांच्यावर याबाबत उपचार झाले होते. नारायण राणे केंद्रात मंत्री झाल्यानंतर महाविकास आघाडीविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. राज्यातील प्रश्न आणि राजकीय परिस्थीतीवर राणेंनी वारंवर महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या एका आक्षेपार्ह विधानामुळे त्यांना पोलिसांनी अटकही केली होती. त्यावेळीही नारायण राणे यांना रक्तदाबाचा व मधुमेहाचा त्रास असल्याची माहिती समोर आली होती.