बीडीडी चाळ, सिडकोसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. यावरून आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील प्रश्न राज घेऊन आल्याने वेगवेगळ्या राजकीय समीकरणांची चर्चा या बैठकीच्या अनुषंगाने केली जात आहे.
बीडीडी चाळीतील नागरिक, सिडको परिसरातील नागरिकांच्या प्रश्नांवर शिंदे-ठाकरेंमध्ये चर्चा होणार आहे. यासाठी राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मनसेचे शिष्टमंडळ शिंदेंच्या भेटीसाठी गेले आहे. सह्याद्री अतिथीगृहावर ही भेट झाली.
आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात बीडीडी चाळीचा पुनर्विकास प्रकल्प होत आहे. यामुळे काही दिवसांपूर्वी मनसेच्या वरळीतील पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. आदित्य ठाकरेंनी काल पोलिसांच्या बीडीडी चाळीतील घरांबाबत पोलिस आयुक्तांची भेट घेतली होती. या साऱ्या गोष्टींवर राज ठाकरेंनी आज एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचे समजते आहे.
राज ठाकरेंनी वरळीकरांचे प्रश्न मांडले आहेत. बीडीडी चाळीतील २२ मजल्यांचा टॉवर ४० मजल्यांचा करण्याचे कसे ठरविण्यात आले, पार्किंगचा प्रश्न, कॉर्पस फंडचा प्रश्न आदी मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे समजते. ही बैठक बातमी लिहिस्तोवर सुरु होती.