Join us  

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 1:02 PM

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनसेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर शनिवारी भेट घेतली. या भेटीदरम्यान मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता अशा विविध विषयांवर चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनसेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता विविध विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. 

मनसेच्या शिष्टमंडळामध्ये बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अजित अभ्यंकर, वैभव खेडेकर,अभिजित पानसे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, या भेटीदरम्यान, उरण येथे यशश्री शिंदे या तरुणीची हत्या झाली. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे समजते. 

याचबरोबर, नवी मुंबई येथे अक्षता म्हात्रे यांच्यावर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरण देखील फास्ट ट्रॅकवर चालवावे आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली. तसेच, आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी यांच्यात सुरू असलेला संघर्ष, राज्यात निर्माण झालेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अशा विविध विषयांवर देखील राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून समजते.

टॅग्स :राज ठाकरेएकनाथ शिंदेमहाराष्ट्रमनसेराजकारण