Join us

MNS 'मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक'; मनसेनं जाहीर केलं नवं घोषवाक्य, सदस्य नोंदणी होणार सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 10:37 AM

'Raj Thackeray Mi Hindhvi Rakshak, Mi Maharashtra Sevak'; This is the new slogan of MNS आजपासून मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात होणार आहे. 

मुंबई- मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या मनसेच्या मेळाव्यात सदस्य नोंदणी सुरु करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आजपासून मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात होणार आहे. 

पुण्यात आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. मनसेच्या पुण्यातल्या मध्यवर्ती कार्यालयात सकाळी या मोहिमेला सुरुवात होणार आहे. या नोंदणीसाठी राज ठाकरेंनी नवीन घोषवाक्य जाहीर केलं आहे. 'मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक', असं मनसेचं नवं घोषवाक्य आहे. यावरुन मराठीबरोबरच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक होणार असल्याचं दिसून येत आहे.  

राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना मोठी जबाबदारी सोपवत असल्याचे म्हटले होते. निवडणूक आयोगानुसार दर तीन- चार वर्षांनी पक्षाला सदस्य नोंदणी करावी लागते. यंदा मोठ्या प्रमाणावर सदस्यनोंदणी होणार आहे.   त्यामुळे आपणही लोकापर्यंत जास्त वेगाने पोहोचायला हवे, मनसे देखील लवकरच सदस्य नोंदणी अभियान सुरु करेल असे राज ठाकरे म्हणाले होते. यानंतर आज मनसेच्या सदस्यनोंदणीला सुरुवात होणार आहे. 

दरम्यान, गणेशोत्सव, दसरा, नवरात्र, दिवाळीत अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी एक मोहिम उघडली जाणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी, चौकात मनसेचे बॅनर, पोस्टर लागले पाहिजेत. ते कसे असावेत, काय काय असावे हे तुम्हाला कळविले जाईल. परंतू, मला ते सर्वत्र दिसायला हवेत असेही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. 

पक्षातील उणीदुणी चव्हाट्यावर न येण्यासाठी राज ठाकरेंनी आपल्यातील वाद सोशल मीडियावर पोस्ट करून नयेत असा दम भरला आहे. राज्यात दिवाळीनंतर कधीही निवडणुका लागू शकतात. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी कधीही निवडणूक लागेल, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत. 

टॅग्स :राज ठाकरेमनसे