मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राज्य सरकारने मनसैनिकांवर कारवाईचा बडगा उगारल्याचं दिसून आलं. मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावत आंदोलनानंतर धरपकड करण्यात आली. या आंदोलनावेळी पोलिसांना गुंगारा देऊन जात असताना महिला पोलीस अधिकारी जखमी झाल्याप्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज ठाकरेंनीही इशारा दिला होता. आता, मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनीही पुन्हा एकदा राज्य सरकारला महाराष्ट्र सल्तनत म्हणत इशारा दिला आहे.
न्यायालयाकडून संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाल्यानंतर ते मीडियासमोर आले. संदीप देशपांडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली. तसेच, महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तुम्ही सत्तेत आहात तुम्ही 302 चा गुन्हा दाखल करू शकता. हे सुडाचं राजकारण करत आहेत. पण, आज तुम्ही सत्तेत आहात, उद्या आम्ही असू, असा इशाराही त्यांनी दिलाय. दुसरीकडे नितीन सरदेसाई यांनीही सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट करत राज्य सरकारला महाराष्ट्र सल्तनत असे म्हटले. तसेच, आम्हाला दाबायला जेवढी ताकद लावाल त्याच्या दुप्पट वेगाने आम्ही उसळी घेऊ, असेही ते म्हणाले.
सरदेसाईंची फेसबुक पोस्ट
2 मे पासून महाराष्ट्रातील मविआ सल्तनत ने आम्हा महाराष्ट्र सैनिकांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लावला होता. अनेकांना स्थानबद्ध केले, अनेकांना अटक केली, जेल मध्ये टाकले, आमच्या पदाधिकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास दिला (अजूनही देत आहेत). या व अशा अनेक प्रकारे आमचे मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रयत्न झाले पण आमचे महाराष्ट्र सैनिक या सगळ्याला पुरून उरले. जेल भोगली, तडीपारी भोगली आणि कोणताही अनुचित प्रकार न करता महाराष्ट्रातील अनाधिकृत भोंग्याचा आवाज बंद करून सुद्धा दाखवला.
महाराष्ट्रातील 'सल्तनत' ने पोलिसांवर दबाव टाकून नको त्या गुन्ह्यांची कलमे लावून आमच्या महाराष्ट्र सैनिकांना अडकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण आम्ही जसे रस्त्यावर संघर्ष करून न्याय मिळवतो त्याच प्रमाणे आम्ही न्यायालयीन लढाई सुद्धा तेवढ्याच ताकदीने लढुन, संघर्ष करून, न्याय मिळवण्यात यशस्वी झालो.
म. वि. आ. सल्तनतच्या या दमनशाहीला अंगावर घेऊन, महाराष्ट्रातील जनतेला आवाजाच्या त्रासातून मुक्त करणार्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना माझा सलाम !!
कायदेशीर प्रक्रियेत महाराष्ट्र सैनिकांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार्या सर्व वकील मंडळी व महाराष्ट्र नवनिर्माण जनहित कक्ष यांचे विशेष आभार. आपले सहकारी अडचणीत असल्याने त्यांच्या सुटकेसाठी धावपळ करणार्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना साष्टांग दंडवत. शेवटी एवढंच सांगेन, आम्हाला दाबायला जेवढी ताकद लावाल त्याच्या दुप्पट वेगाने आम्ही उसळी घेऊ... लावा ताकद.....
जय महाराष्ट्र !