Raj Thackeray: राज ठाकरेंकडे नेते, कार्यकर्ते अन् सर्वकाही होते; मात्र मनसे नेमकी इथेच कमी पडली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 08:16 AM2022-03-14T08:16:09+5:302022-03-14T08:16:21+5:30
शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात एक समान धागा म्हणजे दोन्ही संस्था या त्यांच्या स्थानिक शाखांवर अवलंबून आहेत.
- प्रा. मधुकर चुटे, नागपूर
नुकतेच राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसे या पक्षाने सतराव्या वर्षात पदार्पण केले. सध्या मनसेची पडझड पाहता या पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांचे प्रशासकीय कौशल्य कुठेतरी कमी पडल्याचे दिसते. मनसे पक्ष सुरु करत असताना राज ठाकरे यांच्याकडे सगळे काही होते. कार्यकर्ते होते, नेते होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेचा संपूर्ण अभ्यास आणि अनुभवही होता. शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात एक समान धागा म्हणजे दोन्ही संस्था या त्यांच्या स्थानिक शाखांवर अवलंबून आहेत. मनसे नेमकी इथेच कमी पडली आहे.
नाशिकसारखा महत्त्वाचा गड मनसेच्या हातातून का निसटला? राज्यात मनसेचा पुरेसा प्रभाव का नाही? मुंबई-पुणेत मनसेचे वजन कमी का झाले? या सर्व प्रश्नांचे उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे पक्षात प्रशासकीय कारभाराची कमतरता. या गोष्टीचा राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने मनापासून विचार करायला पाहिजे, त्यावर उत्तर शोधले पाहिजे आणि झटून कामाला लागले पाहिजे. देशस्तरावर भाजपच्या झंझावातापुढे इतर सर्व पक्षांनी माना टाकलेल्या असताना केजरीवाल यांच्या ‘आप’ने एक नवा रस्ता धरला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या एका राज्यात तसा काही प्रयोग करायला काय हरकत आहे?