Raj Thackeray: '...अन् मग सगळ्यांना कळेल'; देशपांडेंवरील हल्ल्याप्रकरणी राज ठाकरेंनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 08:26 PM2023-03-09T20:26:25+5:302023-03-09T21:13:51+5:30
Raj Thackeray On Sandeep Deshpande Attack Case:संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे
मुंबई: गेल्या काही दिवसांआधी मनसे नेते संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर वॉक करत असताना चार अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. क्रिकेट खेळताना जे स्टम्प्स वापरतात त्याद्वारे देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या चारही इसमांनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता. संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकला जातात याची आरोपींना कल्पना होती. हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला होता.
सदर हल्ल्यानंतर पोलिसांनी सदर हल्ला प्रकरणात भांडुपमधून तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. विकास चावरिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे. सदर घटनेनंतर संदीप देशपांडे यांना जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती. पंरतु यावेळी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आज राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
आज मनसेचा १७वा वर्धापण दिन आहे. यानिमित्त ठाण्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. संदीप देशपांडे यांच्यावर ज्याने हल्ला केला, त्यांना आधी कळेल, आणि मग सगळ्यांना कळेल...माझ्या मुलांचं रक्त वाया जाऊ देणार नाही, असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितले.
दरम्यान, शिवाजी पार्क परिसरात मॉर्निंग वॉक दरम्यान देशपांडे यांच्यावर बॅट आणि स्टम्पने हल्ला करण्यात आला होता. गुन्हेशाखेने शिवाजी पार्कसह मुंबईतील सुमारे २५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत अन्य तांत्रिक पुरावे आणि खबऱ्यांच्या मदतीने आरोपी हे भांडूपमधील रहिवासी असल्याची माहिती मिळविली. त्यानंतर गेल्या आठवड्यात महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार आणि जनरल सेनेचा उपाध्यक्ष अशोक खरात (वय ५६) आणि त्याचा सहकारी किशन सोलंकीला (३५) ताब्यात घेत अटक केली आहे.
हल्ला करणारा ठाकरे गटाचा पदाधिकारी-
गुन्हे शाखेच्या कक्ष ५ चे प्रभारी पोलिस निरीक्षक घनश्याम नायर यांच्या पथकाने भांडुपच्या कोकणनगर येथून खरात आणि त्याचा साथीदार किशन सोळंकी (३५) याला शनिवारी अटक केली. खरात हा महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार आणि जनरल सेना उपाध्यक्ष असून, त्यांचे चेंबूरमध्ये कार्यालय आहे. खरातने काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केला होता. खरात याच्यावर डोंबिवली पोलिस ठाण्यात खून, रबाळे पोलिसांत खंडणी, मकोका तसेच भांडुप पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दंगल यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"