Raj Thackeray: मनसे नेत्यांची राज ठाकरेंसोबत बैठक सुरु; हालचालींना वेग, सर्वांचं लागलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 02:01 PM2022-06-27T14:01:03+5:302022-06-27T14:04:26+5:30
एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना फोन करुन सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई- महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा सातवा दिवस आहे. विधान परिषद निवडणूक निकालानंतर सुरू झालेलं बंड अजूनही सुरू असून आता हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. शिवसेनेकडून होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. याबाबत आता सुनावणी देखील सुरु झाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे बहुतांश मंत्री आज शिंदे गटात सामील झालेत. त्यात आता आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी शिंदे गट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत हातमिळवणी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना फोन करुन सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांकडे शिवसेनेचे उरले फक्त ५ मंत्री; आदित्य ठाकरेंसह कोणाचा समावेश, पाहा नावं!
मनसेकडून मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. परंतु आता मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि अन्य काही नेत्यांची राज ठाकरे यांच्यात बैठक सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मनसे सध्याच्या राजकीय घडमोडींवर कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, राज ठाकरेंनी २००६ मध्ये शिवसेना पक्षाला जय महाराष्ट्र केला होता. उद्धव ठाकरे आणि त्याच्या सहकाऱ्यांना कंटाळून मी पक्ष सोडल्याचं राज यांनी जाहीर केले होते. त्यानंतर इतक्या वर्षांनी शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंड होत असल्याचं समोर आले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाचे ३८ आमदार फुटल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता तांत्रिकदृष्ट्या या विलीनीकरण करायचं झाल्यास मनसेमध्ये हा गट समाविष्ट होईल का यावर चर्चा सुरू आहे.
मोठी बातमी! बंडखोर मंत्र्यांच्या खात्यांचं मुख्यमंत्र्यांकडून फेरवाटप, कुणाकडे कोणतं खातं दिलं पाहा...https://t.co/RBgHpCcxgD
— Lokmat (@lokmat) June 27, 2022
एकनाथ शिंदेंकडची दोन्ही खाती सुभाष देसाईंकडे-
जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे,आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) हे खातं शिवसेनेचे आमदार सुभाष देसाई यांच्याकडे देण्यात आलं आहे. तसेच गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे, दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील (रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.