Join us

Raj Thackeray: मनसेकडून राष्ट्रवादी पुन्हा टार्गेट, जेम्स लेनच्या मुलाखतीनंतर प्रथमच आली रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 10:50 AM

जेम्स लेनच्या मुलाखतीनं राज्यातील वातावरण पुन्हा ढवळून निघालं आहे. या मुलाखतीनंर मनसेनं पुन्हा राष्ट्रवादीला टार्गेट केलं आहे.

मुंबई - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांना सॉफ्ट टार्गेट करण्याचं काम राष्ट्रवादीने केले. १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर राज्यात जातीयवाद वाढला असा आरोपही राज ठाकरे यांनी केला होता. तर, आपण बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरील केलेले आरोप आजही ठाम आहेत, असं म्हणत शरद पवारांनी स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर, आता वादग्रस्त पुस्तकाचे लेखक जेम्स लेनच्या मुलाखतीनं राज्यातील वातावरण पुन्हा ढवळून निघालं आहे. या मुलाखतीनंर मनसेनं पुन्हा राष्ट्रवादीला टार्गेट केलं आहे.

छत्रपती शिवरायांबाबत ज्या जेम्स लेननं वादग्रस्त पुस्तक(James Laine Controversial Book) लिहिलं होतं, त्याने बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यानंतर, मनसेच्या संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन राष्ट्रवादी काँग्रेस हा जातीयवादी पक्ष असल्याचं सिद्ध झाल्याचं म्हटलंय. ''राज ठाकरे जे म्हणाले होते "राष्ट्रवादीने जाती जाती मध्ये द्वेष पसरवण्याचे काम केले"जेम्स लेन च्या मुलाखतीने पुन्हा सिद्ध केले. चूक कबूल केली म्हणून कितीही मोठा माणूस छोटा होत नाही हे लहानपणी आम्हाला शाळेत शिकवलं होत,'' असं ट्विट देशपांडे यांनी केलं आहे. काय म्हणाला जेम्स लेन?

ज्या छत्रपती शिवरायांबाबत जेम्स लेननं वादग्रस्त पुस्तक(James Laine Controversial Book) लिहिलं होते त्याने बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. इंडिया टुडेने घेतलेल्या मुलाखतीत जेम्स लेननं हे भाष्य केले आहे. त्या पुस्तकात आपण कुठलाही ऐतिहासिक दावा केला नाही. तसेच पुस्तकासाठी कुणीही माहिती पुरवली नाही असंही जेम्स लेननं म्हटलं आहे. जेम्स लेन म्हणतो की, माझं Shivaji Hindu King In Islamic India पुस्तक त्यात कुठलाही ऐतिहासिक दावा केला नाही. मी फक्त कथा सांगितली त्याला ऐतिहासिक तथ्य नाही. त्याचसोबत बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी एका शब्दानेही चर्चा झाली नाही असं स्पष्टीकरण त्याने दिले आहे.

मुलाखतीवर काय म्हणते राष्ट्रवादी

जेम्स लेनच्या मुलाखतीवर मंत्री जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) चांगलेच संतापले. आव्हाड म्हणाले की, हा वाद २००३ मध्ये सुरू झाला हा कुंभकर्ण झोपला होता का? एवढेच जर शिवाजी महाराजांबद्दल प्रेम होते तर तो मजकूर वगळला का नाही? जेम्स लेनला कोण मॅनेज करतंय हे माहिती नाही. जेम्स लेनची सुरुवात कोणी केली ते सगळ्यांना माहिती आहे. जेम्स लेन इतक्या वर्षाने कसा सापडला? किती मोठा कट आहे. महाराष्ट्रात अस्वस्थता निर्माण करण्याचं काम केले जात आहे. आम्ही येडे म्हणून जन्माला आलोय का? २००३ वाद, महाराष्ट्र भूषण तेव्हा जेम्स लेन कुठे होता? हा ईमेल कुठून मिळाला? महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळू नका परिणाम गंभीर होतील असा इशारा त्यांनी दिला. 

टॅग्स :मनसेराज ठाकरेबाबासाहेब पुरंदरेसंदीप देशपांडे