मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी 1 मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार असल्याचे जाहीर केले. तत्पूर्वी 3 मे पर्यंत राज्य सरकारला मशिदींवरील भोंगे हटविण्यासंदर्भात त्यांनी इशाराही दिला आहे. त्यावरुन, सध्या राज्यात चांगलंच राजकारण तापलं असून राज्यातील सर्वपक्षीय नेते राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल मत व्यक्त करत आहेत. मुंबई पोलिसांनी रात्री 10 ते सकाळी 6 लाऊडस्पीकरला बंदीही घातली आहे. आता, मनसेची या भूमिकेला आणखी जोर देत भोंगा चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.
राज ठाकरेंच्या 1 मे रोजी होणाऱ्या सभेची मनसैनिकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी, परवानग्या घेऊन आणि परवानग्या नाही मिळल्या तरी सभा घेणारच अशी भूमिका मनसेनं जाहीर केली आहे. त्यातच, आता मनचिसेचे अमेय खोपकर यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मराठी भोंगा हा चित्रपट रिलीज करण्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी भोंग्यांसदर्भात 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तर, दुसरीकडे 3 मे रोजीच भोंगा चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणाही मनसेकडून करण्यात आली आहे.
''सन 2018 रोजी हा चित्रपट बनवून तयार झाला. या सिनेमाा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असून आणखी जवळपास 10 अवॉर्ड मिळाले आहेत. हा चित्रपट धार्मिक नसून सामाजिक आहे. आता, 3 मे रोजी जगभरात हा चित्रपट प्रदर्शित होत असून मनेसकडून हा चित्रपट पाहण्याची विनंती सर्वांना करण्यात आली आहे. मनचिसेचे प्रमुक अमेय खोपकर यांनी या चित्रपटाचे पोस्टर्स रिलीज केले. यावेळी, चित्रपट पाहण्याची विनंती संदीप देशपांडे यांनी केली आहे. त्यामुळे, या चित्रपटाच्या माध्यमातून मनसेचा भोंगा पुन्हा जोरात वाजणार असल्याचे दिसून येते.