Raj Thackeray: 'आपल्या फर्ड्या शैलीत सभा गाजवणारे...'; आव्हाडांनी राज ठाकरेंना दिल्या खास शैलीत शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 03:43 PM2021-06-14T15:43:09+5:302021-06-14T15:43:30+5:30
मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा आज (14 जून) 53 वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी त्यांच्या 'कृष्णकुंज' निवासस्थानी कार्यकर्त्यांची रीघ लागते. परंतु कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मागील वर्षीप्रमाणे यंदाही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील विविध नेते देखील शुभेच्छा देत आहेत.
मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले की, आपल्या फर्ड्या शैलीत लाखोंच्या सभा गाजवणारे लोकप्रिय वक्ते, कुंचल्याच्या फटकाऱ्यातून मार्मिक संदेश देणारे उत्तम व्यंगचित्रकार, कलासक्त आणि रसिक माणूस, महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळालेले एक उत्तुंग व्यक्तिमत्व, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या फर्ड्या शैलीत लाखोंच्या सभा गाजवणारे लोकप्रिय वक्ते,कुंचल्याच्या फटकाऱ्यातून मार्मिक संदेश देणारे उत्तम व्यंगचित्रकार,कलासक्त आणि रसिक माणूस,महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळालेले एक उत्तुंग व्यक्तिमत्व,मनसे प्रमुख श्री.राज ठाकरेजी यांच वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन..! pic.twitter.com/L1CqvOqIdO
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 14, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी देखील राज ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. 'एक कलासक्त राजकारणी', असं म्हणत रोहित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
'मनसे';चे अध्यक्ष आणि एक कलासक्त राजकारणी @RajThackeray साहेब आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला उदंड आणि निरोगी आरोग्य लाभो, ही प्रार्थना! pic.twitter.com/qtJMbSmgGS
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 14, 2021
दरम्यान, राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करणारं पत्रच काही दिवसांपूर्वी ट्वीट केलं होतं. "मागील वर्षीप्रमाणे हे वर्ष देखील बिकट आहे. कोरोनाने महाराष्ट्राला घातलेला विळखा सुटलेला नाही. लॉकडाऊन उठला असला तरी परिस्थिती अजूनही गंभीर आहे. अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं मनाला पटत नाही. माझे सहकारी म्हणून तुम्ही हे नक्की समजून घ्याल. त्यामुळे माझ्या भेटीसाठी घरी येऊ नका. तुमच्या घरीच राहा. जिथे आहात, तिथे सुरक्षित रहा. कुटुंबीयांची आणि आसपासच्या लोकांची काळजी घ्या. तुम्ही प्रेमाने याल आणि आपली भेट होणार नाही असं होऊ नये. थोड्याच दिवसात मी तुम्हाला भेटणार आहे" असं राज यांनी पत्रात म्हटलं आहे.