मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात जोरदार भाषण केलं. आपल्या भाषणात शिवसेना, राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीवरही त्यांनी निशाणा साधला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस हा जातीयवादी पक्ष असल्याचं ते म्हणाले. तसेच, शिवसेनेनं भाजपला दगाफटका केल्याचंही त्यांनी सांगितलं. एकंदरीत आपल्या भाषणात त्यांनी राजकीय प्रहार केले. त्यासोबतच महापुरुषांच्या जयंतींबद्दलही मत व्यक्त केलं.
राज यांनी मशिंदींवर असलेल्या भोंग्यांचा मुद्दाही आपल्या भाषणात घेतला. तसेच, राज्य सरकारने हे भोंगे न उतरवल्यास, आम्ही बाजुलाच मोठे स्पीकर लावून हनुमान चालिसा वाजवू, असा इशाराही दिला. त्यामुळे, राज यांचे हे भाषण चांगल्याच चर्चेचा विषय ठरले आहे. या भाषणानंतर त्यांच्यावर टीकाही करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर पलटवारही केला.
जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांचा एक व्हिडिओ पोस्ट करत अजून एक ट्विट केले आहे. 6 डिसेंबरला चैत्यभूमीला भेट देणाऱ्या बंधू भगिनींन बद्दल आपण काय बोललात हे कुणी विसरलेले नाही. नुसत्या मिरवणूका काय काढायला सांगता संविधानाचा सन्मान राखीन अशी शप्पथ घ्या तुमचे भाषणच संविधान विरोधी होते आणि हो भाषणाच्या शेवटी जयभीम ही म्हणा. निवडणुकीसाठी वाट्टेल ते... असेही आव्हाड यांनी म्हटले होते.
दरम्यान, गेल्या 2 दिवसांपासून राज ठाकरेंच्या भाषणाची चर्चा सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच, भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यामुळे, राज यांची भाजपसोबत वाढत असलेली जवळीक चर्चेचा विषय ठरत आहे.