Join us

Raj Thackeray: ... अन्यथा पोलिसांनी राज ठाकरेंना बेड्या ठोकाव्यात, वंचित बहुजन आघाडी आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 8:56 AM

राज यांनी आपल्या भाषणात मुंबईतील काही भागांचा उल्लेख केला. त्यात, मुब्रा परिसरातील मशिदींवर ईडीने धाडी टाकाव्यात, असेही म्हटले

मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरेंचे गुढी पाडवा मेळाव्यातील भाषण सध्या चांगलेच चर्चेत आहेत. मनसैनिक आणि भाजप नेते राज याच्या भाषणाचे समर्थन करत असले तरी मोठ्या प्रमाणात इतर राजकीय पक्ष त्यांच्या भाषणावरुन टीका करत आहे. त्यात विशेषत: राज यांनी मशिदीवरील भोंग्यांना हनुमान चालिसाने उत्तर देण्याची भाषा केल्याने अनेकांनी धार्मिक तेढ निर्माण करु नका, असे म्हणत राज यांना सुनावले आहे. आता, वंचित बहुजन आघाडीने राज यांचे भाषण पोलिसांनी गांभीर्याने घेण्याचं सूचवलं आहे. 

राज यांनी आपल्या भाषणात मुंबईतील काही भागांचा उल्लेख केला. त्यात, मुब्रा परिसरातील मशिदींवर ईडीने धाडी टाकाव्यात, असेही म्हटले. मदरसे आणि मशिंदींमध्ये समाजविघातक कृत्य घडत आहेत. आपल्याला कशाला हवाय पाकिस्तान असे म्हणत राज यांनी मुंबईतील विशिष्ट समुदायाला लक्ष्य केलं. राज यांच्या या विधानानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून वंचित बहुजन आघाडीनेराज ठाकरेंचे भाषण गंभीरतेनं घेण्याचं सूचवलं आहे. राज ठाकरेंच्या विधानात तथ्य असेल तर महाराष्ट्र पोलिसांनी मशिदी सील कराव्यात, पण जर राज ठाकरेंच्या विधानात तथ्य आढळून आले नाही तर त्यांना युएपीए कायद्यांतर्गत पोलिसांनी बेड्या ठोकाव्यात, अशी सडेतोड भूमिका वंचितने घेतली आहे. 

वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या नावाने प्रसिद्धीपत्रक काढून राज यांच्या भाषणावर परखड मत मांडत मागणी केली आहे. "शिवाजी पार्क येथील गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मदरसे आणि मशिदीमध्ये समाज विघातक गोष्टी घडत आहेत, असा गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी राज ठाकरे यांचे स्त्रोत तपासून ज्या मशिदीत अथवा मदरशांमध्ये समाजविघातक कृत्य घडत आहेत, तेथे कसून चौकशी करावी. जर काही तथ्य आढळल्यास मशिदी सील करुन जबाबदार मशिद/मदरसा समितीवर कडक कायदेशीर कारवाई करावी", असे वंचितन म्हटले आहे. तसेच, "परंतु जर या वक्तव्यामध्ये काहीही तथ्य आढळून आले नाही तर समाजामध्ये दहशत व विद्वेष पसरविण्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यावर युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करून राज ठाकरेंना बेड्या ठोका", अशी मागणीच वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी पत्रकाद्वारे केली आहे. 

अमित ठाकरेंना हनुमान चालिसा म्हणायला लावा -

"राज ठाकरेंच्या वक्तव्याला पूर्णपणे पाठिंबा आहे. पण त्याआधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी", असं सुजात आंबेडकर म्हणाले आहेत. यासोबत राज यांच्या विधानावर जोरदार टीका सुजात यांनी केली. "माझी राजसाहेबांना विनंती आहे की तुम्ही शरद पवारांचा इंटरव्ह्यू घ्या किंवा मग स्वत: पक्ष भाड्यानं लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा. पण तुमचा संपलेला पक्ष हिंदू-मुस्लीम दंगलीवर उभा करू नका", असंही सुजात आंबेडकर म्हणाले. सुजात आंबेडकरांनी दिलेल्या आव्हानावर आता अमित ठाकरे प्रतिक्रिया देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेवंचित बहुजन आघाडीपोलिस