“मनमोहन सिंग यांनी न बोलता, शांतपणे करुन दाखवले, ते अनेकांना बोलून करता आले नाही”: राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 11:23 IST2024-12-27T11:17:49+5:302024-12-27T11:23:23+5:30

Raj Thackeray Reaction On Manmohan Singh Sad Demise: राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, 'ये दिल मांगे मोअर..' ही जी वृत्ती भिनली आहे, त्याचे शिल्पकार हे डॉ. मनमोहन सिंगच.

raj thackeray pay tribute to former pm manmohan singh sad demise | “मनमोहन सिंग यांनी न बोलता, शांतपणे करुन दाखवले, ते अनेकांना बोलून करता आले नाही”: राज ठाकरे

“मनमोहन सिंग यांनी न बोलता, शांतपणे करुन दाखवले, ते अनेकांना बोलून करता आले नाही”: राज ठाकरे

Raj Thackeray Reaction On Manmohan Singh Sad Demise: देशाच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत भारताला नवीन उंची मिळवून देणारे माजी पंतप्रधान तसेच ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग हे वयाच्या ९२व्या वर्षी गुरुवारी रात्री कालवश झाले. त्यांच्या निधनामुळे देशाने एक अर्थऋषी गमावला आहे. मनमोहन सिंग यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील व सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळला जाईल. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. देशभरातून मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली जात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणतात की, भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन झाले. १९९१ ला जेंव्हा मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री झाले तेंव्हा देशाची अर्थव्यवस्था अतिशय तोळामासाची होती. एका बाजूला बर्लिन भिंत कोसळली होती आणि शीतयुद्धाचा शेवट झाला होता, साम्यवादी चीनच्या आर्थिक ताकदीची चुणूक दिसायला लागली होती. अशावेळेस भारतीय उद्योगांच्या पायात आधीच्या काँग्रेसच्या सरकारांनी ज्या बेड्या घातल्या होत्या, त्या तोडून काढण्याचे काम डॉ. मनमोहन सिंग यांनी उदारीकरणाचे धोरण स्वीकारून केले. अर्थात नरसिंहरावांसारख्या पंतप्रधानाची साथ त्यांना लाभली हे देखील खरे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

भारताच्या काळाचा खरा शिल्पकार म्हणजे डॉ. मनमोहन सिंग

जुलै १९९१ साली संसदेत भाषण करताना मनमोहनसिंगांनी एक वाक्य वापरलं होतं, "no power on earth can stop an idea whose time has come". थोडक्यात भारताचा काळ सुरु होत आहे आणि आता त्याला कोणीच थांबवू शकत नाही. भारताच्या या काळाचा खरा शिल्पकार म्हणजे डॉ. मनमोहन सिंग. पुढे ते देशाचे पंतप्रधान झाले. आणि ते देखील सलग दहा वर्ष. अशा पदावर बसलेल्या व्यक्तीच्या हातून घेतलेले काही निर्णय हे चांगले, तर काही चुकणार हे स्वाभाविक आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांच्यावर ज्या पद्धतीने टीका केली गेली, त्यांच्या हेतुंवर शंका घेतली गेली, त्यावरून पत्रकारांशी संवाद साधताना एक वाक्य म्हणाले होते, "I do not believe that I have been a weak Prime Minister. I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media or for that matter the Opposition in Parliament.... ", असे राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. 

मनमोहन सिंग यांनी न बोलता, शांतपणे करुन दाखवले, ते अनेकांना बोलून करता आले नाही

पुढे राज ठाकरे लिहितात की, डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर इतिहास कधीच क्रुद्ध होणार नाही, उलट त्यांचा गौरव करेल हे नक्की. भारतीयांमध्ये मग ते उद्योजक असोत, व्यावसायिक असोत, की नोकरदार वर्ग असो, अधिक उत्तम काहीतरी करावे, घडवावे यासाठी 'ये दिल मांगे मोअर..' ही जी वृत्ती भिनली आहे, त्याचे शिल्पकार हे डॉ. मनमोहन सिंगच. डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल जगभरात एक उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ म्हणून आदर होता, पुढारलेल्या देशांचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्या कृतीतून आणि वक्तव्यातून तो दिसून यायचा. जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या ज्ञानाचा आणि कार्याचा गौरव झाला होता. इतकी बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व असलेल्या मनमोहन सिंगांनी न बोलता, शांतपणे जे करून दाखवले ते अनेकांना बोलून पण करून दाखवता आलेले नाही. डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन... राज ठाकरे ।
 

Web Title: raj thackeray pay tribute to former pm manmohan singh sad demise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.