Raj Thackeray: "आमच्या वाटेला येऊ नका, आलात तर सोडणार नाही", राज ठाकरेंना पीएफआयची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 08:36 AM2022-04-16T08:36:56+5:302022-04-16T08:49:33+5:30
Raj Thackeray News: भोंग्यांवरून झालेल्या वादानंतर पीएफआयने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकी दिली आहे. पीएफआयचे मुंब्य्रातील अध्यक्ष मतीन शेखानी यांनी ही धमकी दिली आहे.
मुंबई - मशिदींवरील भोंग्यांविरोधात मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी आघाडी उघडली आहे. ज्या मशिदींमधून भोंग्यावर नमाज आणि अजान म्हटली जाते, तिच्यासमोर भोंग्यांवरून हनुमान चालिसा वाजवण्याचे आवाहान राज ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, भोंग्यांवरून झालेल्या वादानंतर पीएफआयने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकी दिली आहे. पीएफआयचे मुंब्य्रातील अध्यक्ष मतीन शेखानी यांनी ही धमकी दिली आहे. देशामध्ये मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत. आमच्या वार्तेला आलात तर सोडणार नाही हा आमचा नारा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
मुंब्रामधील पीएफआयचे अध्यक्ष मतीन शेखानी यांनी मध्य प्रदेश राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये रामनवमीच्या शोभायात्रांमध्ये झालेल्या हिंसाचाराचा विरोध केला आहे. मतीन शेख यांनी सांगितले की, मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत. काही लोक मुंब्य्रातील वातावरण बिघडवत आहेत. ‘छेडोगे तो छोडेंगे नही’ हे आमचे घोषवाक्य आहे. तसेच भोंग्यावरून होणाऱ्या अजानबाबत त्यांनी सांगितले की, एकाही भोंग्याला हात लावला तर पीएफआय सर्वात समोर असेल. दरम्यान, पीएफआयचे आंदोलन संपल्यानंतर मुंब्रा पोलिसांना पत्रकही देण्यात आले आहे.
मनसेकडून मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी महाराष्ट्र सरकारला ३ मे पर्यंतचे अल्टिमेटम देण्यात आले आहे. दरम्यान, आज मनसेकडून हनुमान मंदिरांमध्ये हनुमाच चालिसा पठण केली जाणार आहे. तर मनसेप्रमुख राज ठाकरे हे आज संध्याकाळी पुण्यामध्ये सार्वजनिक हनुमान चालिसा पठणामध्ये सहभागी होणार आहेत.