Raj Thackeray: राज ठाकरेंचा नितीन गडकरींना फोन, म्हणाले...जनतेला सबबी कशा देणार? आता तुम्हीच...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 12:32 PM2022-12-20T12:32:03+5:302022-12-20T12:34:42+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच कोकण दौरा केला. यात राज ठाकरेंनी पक्ष संघटनेसोबतच कोकणातील समस्या जाणून घेतल्या तसंच त्या सोडवण्याचं आश्वासन जनतेला दिलं.
मुंबई-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच कोकण दौरा केला. यात राज ठाकरेंनी पक्ष संघटनेसोबतच कोकणातील समस्या जाणून घेतल्या तसंच त्या सोडवण्याचं आश्वासन जनतेला दिलं. या दौऱ्याबाबत बोलत असताना राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा उल्लेख केला. तसंच या कामाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर संवाद झाल्याची माहिती राज ठाकरे यांनी आज दिली. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
"मी नुकताच कोकण दौरा केला. मुंबई-गोवा महामार्गाची परिस्थिती पाहिली. त्यानंतर नितीन गडकरींना फोन केला आणि माहिती दिली. जर समृद्धी महामार्गासारखा ७०० किमी लांबीचा महामार्ग इतक्या कमी वेळात होऊ शकतो. मग मुंबई-गोवा महामार्ग १६ वर्ष होऊनही पूर्ण का झालेला नाही? गडकरींनी याबद्दल सविस्तर माहिती मला दिली. दोन कॉन्ट्रॅक्टर पळून गेले वगैरे इतर माहिती दिली. पण जनतेला या सबबी देता येत नाहीत. आता तुम्हीच वैयक्तिकरित्या यात लक्ष घालून काम लवकरात लवकर कसं पूर्ण होईल ते बघा असं गडकरींना सांगितलं आहे", असं राज ठाकरे म्हणाले.
गडकरींनी तातडीनं यात लक्ष घालून येत्या आठवड्याभरात काय करता येईल ते बघतो आणि कळवतो असं आश्वासन दिलं असल्याचंही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. यासोबतच या महामार्गाबाबत देवेंद्र फडणवीसांशीही बोलणं झालेलं असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
पालघरमध्ये मनसेला ग्रामपंचायतीत यश
ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेला पालघरमध्ये यश प्राप्त झालं आहे. गुंदले ग्रामपंचायतीवर मनसेची सत्ता आली आहे. सातपाटी ग्रामपंचायतीमध्ये तीन जागांवर मनसेचे उमेदवार विजयी झाले आहेत. याबाबत बोलताना राज ठाकरे यांनीही मनसेला आणखी यश मिळेल असं विधान केलं आहे. "चांगली गोष्ट आहे. निकाल अजून लागत आहेत आणि आम्हाला आणखी चांगलं यश मिळेल", असं राज ठाकरे म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम