Join us

Raj Thackeray: राज ठाकरेंची भेट अन् मोठी घोषणा; नवाज सिद्दिकी म्हणाला 'जय महाराष्ट्र'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 9:39 AM

गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक, पत्नीसोबतच्या वादामुळे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी चर्चेत आहे

मुंबई - बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप टाकून कोट्यवधी सिनेरसिकांच्या मनावर राज्य करणारा नवा आता पुन्हा एकदा मराठी प्रोजेक्ट घेऊन येतोय. काही वर्षांपूर्वी नवाजने ठाकरे सिनेमात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका बजावली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून नवाज महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला, शिवसैनिकांच्या घराघरात पोहोचला होता. आता, पुन्हा एकदा मराठी प्रोजेक्ट घेऊन नवाज पडद्यावर झळकणार आहे. मनसेप्रमुखराज ठाकरे यांची भेटही नवाजने घेतली. तसेच, लवकरच आपण इंटरेस्टींग मराठी प्रोजेक्ट घेऊन येतोय, अशी घोषणाही केली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक, पत्नीसोबतच्या वादामुळे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी चर्चेत आहे. मात्र, याचदरम्यान, नवाजने राज ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे, या भेटीमागे नेमकं कारण काय, अशी चर्चा राजकीय आणि सिनेसृष्टीत रंगली होती. यासंदर्भात स्वत: नवाजने ट्विट करुन खुलासा केला आहे. मराठी भाषा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली आहे. मराठी नाटक, मराठी सिनेमा आणि महाराष्ट्राच्या लोककला यांचा मी चाहता आहेच. सर्वांना मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा !!. लवकरच अभिजीत पानसे यांच्यासोबत काहीतरी  इंटरेस्टिंग येणार आहे. #जयमहाराष्ट्र, असे ट्विट नवाजने केले आहे. त्यामुळे, बाळासाहेबांची भूमिका साकारणारा नवाज आता कोणत्या रुपात समोर येतोय, काय घेऊन मराठीजनांसमोर येतोय, याची उत्सुकता सर्वांनाच लागलीय. 

दरम्यान, नवाजुद्दीन याचा राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ येथील निवासस्थानाचा एक फोटो समोर आलाय. या फोटोत अभिजीत पानसेदेखील दिसत आहेत. याशिवाय राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित ठाकरे देखील या फोटोत दिसत आहेत.

राजभेटीमुळे नवाज चर्चेत

नवाजुद्दीनने राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन शनिवारी त्यांची भेट घेतली. नवाज गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कलहात अडकला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याचा पत्नीपासून वाद सुरु आहे. ते बारा वर्षांपूर्वी वेगळे झाले आहेत. पण आता मुलांवरुन दोघांमध्ये सातत्याने वाद होताना दिसत आहेत. दोघांमधील वाद आता कोर्टापर्यंत पोहोचला आहे. या वादामुळे नवाजुद्दीन हा अडचणीत आलेला आहे. त्यातच, तो राज ठाकरेंना भेटल्याने राजकीय चर्चेंना उधाण आले होते. मात्र, या भेटीवरील पडदा आता पडला आहे. 

टॅग्स :राज ठाकरेनवाझुद्दीन सिद्दीकीमनसेमराठी