Join us  

Raj Thackeray Ranjeet Savarkar: रणजीत सावरकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट, अभिनंदन करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 1:17 PM

राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावकरांबद्दल केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर झाली भेट

Raj Thackeray Ranjeet Savarkar Meeting: गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विषयी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या विधानांवर खळबळ माजली आहे. सावरकरांबाबत काही आक्षेपार्ह विधाने केल्यानंतर, वाद निर्माण झाला आहे. मराठी मातीत जन्मलेल्या सावरकरांबद्दल असे बोलणे हा मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी जनभावना दिसून आली. सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनीही काही दाखले देत राहुल गांधींच्या विधानाचा समाचार घेतला. असे असताना, काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) महत्त्वाचे पदाधिकारी राहुल गांधींविरोधात निषेध नोंदवण्यासाठी थेट शेगांवला निघाले. भारत जोडो यात्रेत काल राहुल गांधींचे शेगांवला भाषण होते. पण मनसेच्या कार्यकर्त्यांना तेथे जाऊन देण्यात आले नाही. असे असले तरी, सावरकरांबद्दल असलेला आदर दाखवून थेट राहुल गांधींना जाब विचारायला गेल्याने रणजीत सावरकर यांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे कौतुक केले. याच मुद्द्यावर आज, रणजीत सावरकर यांनी शिवतीर्थवर (Shivtirtha) जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांचे अभिनंदन केले.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. राहुल गांधींनी महाराष्ट्रात येऊन, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काही विधाने केली. त्यामुळे नवा वाद उफाळून आला. महाविकास आघाडी जरी एकत्र असली तरी राहुल गांधींच्या विधानाशी सहमत नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. राहुल गांधींच्या निषेधासाठी ठिकाठिकाणी मोर्चे काढण्यात आले. त्यांच्या प्रतिमेला किंवा पुतळ्याला जोडे मारण्याचे आंदोलनदेखील करण्यात आले. अशा वेळी आज रणजीत सावरकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी राज ठाकरे यांचे आणि त्यांच्या मनसैनिकांचे अभिनंदन केले. "राहुल गांधींच्या विरोधात महाराष्ट्रात जी आंदोलने झाली त्यातील सर्वात महत्त्वाचे आंदोलन मनसेकडून करण्यात आले. मनसेच्या कार्यकर्त्यांना अडवण्यात आले होते. पोलिसांनी त्यांची अडवणूक केली असली तरी ते लोक राहुल गांधींच्या सभेच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी निषेधाचे झेंडे फडकवले. त्यासाठी मी राज ठाकरेंना धन्यवाद म्हणायला आणि त्यांचे अभिनंदन करायला आलो होतो," असे रणजीत सावरकरांनी स्पष्ट केले.

"राहुल गांधींनी केलेल्या विधानानंतर अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलने करण्यात आली. त्याच विषयावर आज मनसे प्रमुख राज ठाकरेंशी माझी चर्चा झाली. यापुढे आंदोलन अधिक तीव्र होणार की नाही याबद्दल मी भूमिका सांगू शकत नाही. मनसेचे पदाधिकारी किंवा राज ठाकरे स्वत: याबद्दलची त्यांची भूमिका सांगतील. मी आज त्यांच्या आंदोलनाबद्दल अभिनंदन करण्यासाठी आलो होतो," असेही रणजीत सावरकर म्हणाले.

टॅग्स :राज ठाकरेविनायक दामोदर सावरकरराहुल गांधीभारत जोडो यात्रा