Join us

"मी निशाणी लोकांमधून कमावलीय, ढापली नाही"; सत्तासंघर्षावरुन राज ठाकरेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 3:47 PM

पक्षाचे नाव व चिन्ह घेणं योग्य नसल्याचे म्हणत राज ठाकरेंनी महाराष्ट्र सुरु असलेल्या राजकारणावर भाष्य केलं आहे.

Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. महायुतीसोबत जागा वाटपाचा प्रश्न पुढे न गेल्याने राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पाठिंबा देण्याचे ठरवलं होतं. राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा देखील घेतल्या होत्या. मात्र राज ठाकरे यांनी आता लोकसभा निवडणुकीत मागितलेल्या जागांबाबत भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतून उमेदवारी न मिळाल्याबाबत राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल बोलताना महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकारणावरही भाष्य केलं. पक्षाचे नाव व चिन्ह घेणं योग्य नसल्याचे म्हणत राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना टोला लगावला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईची जागा दिली असती तर ती १०० टक्के निवडून आली असती असेही राज ठाकरे म्हणाले. मात्र त्यावेळी शिवसेनेकडून मनसेच्या उमेदवाराला धनुष्यबाण चिन्हावरुन लढण्याची ऑफर देण्यात आली होती. त्याबाबतही राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. 

"प्रत्येक पक्षाचा आपापल्या पद्धतीने ओरबाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण लोकांना किती आणि काय काय सांगायला जायचं. याचा अनुभव लोकसभेच्या निवडणुकीत आलाच. लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईची जागा तुमच्या हाती लागणार नाही हे मी त्यांना सांगितलं होतं. हे सांगून हट्टा पायी जागा पाडायच्या असतील तर पाडून घ्या. ती जर जागा आम्ही लढलो असतो १०० टक्के चित्र वेगळं असतं. त्यानंतर ते सांगतात की तुम्ही आमच्या निशाणीवर निवडणूक लढवली पाहिजे. कसं आहे मी लोकांमधून कमावलेली निशाणी आहे ढापलेली नाही. इतक्या वर्षांच्या निवडणुकीच्या प्रवासात मिळालेली निशाणी आहे. ती निशानी लोकांच्या मतदानातून मिळालेली आहे कोर्टातून आलेली नाही," असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

"कुठल्याच पक्षाच्या बाबतीत अशा गोष्टी होता कामा नये. कारण मी ती गोष्ट केलेली नाही. मी जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा माझ्याकडे ३७ आमदार आणि सात ते आठ खासदार आले होते. मी त्यांना सांगितलं मला पक्ष फोडून नवीन पक्ष काढायचा नाही. मला असली गोष्ट नकोच आहे. त्यापेक्षा सत्ता न आलेली बरी आहे. मी कमजोर किंवा कमकुवत आहे का. लोक एक दिवस माझ्या हातात सत्ता देतील. बाकीच्या राजकीय पक्षांना सत्ता हातात यायला इतकाच वेळ लागला. माझा पक्ष फुटल्याचा किंवा चिन्ह गेल्याचा  नाही तर या प्रक्रियेचा विरोध आहे. फोडाफोडीचे राजकारण मी समजू शकतो पण नाव आणि चिन्ह गेलं ही गोष्ट योग्य नाही. धनुष्यबाण उद्धव ठाकरेंची कमाई नाही. ती बाळासाहेब ठाकरेंची कमाई आहे. अशा प्रकारचे राजकारण मला आवडत नाही," असेही राज ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबई विधानसभा निवडणूकराज ठाकरेएकनाथ शिंदे