राज ठाकरे विधानसभेच्या मैदानात; ५ ऑक्टोबरला प्रचाराचा नारळ फोडणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 01:01 PM2019-09-30T13:01:48+5:302019-09-30T13:16:05+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज दिवंगत शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेत प्रवेश केला.
मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज आत्महत्याग्रस्त शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेत प्रवेश केला. वांद्र्यातील एमआयजी क्लबमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्यात हा पक्षप्रवेश झाला असून, यावेळी मनसे कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. विधानसभा निवडणुकीच्या जागांबाबत योग्य वेळी घोषणा करणार असल्याचंही राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले. 5 तारखेला राज ठाकरेंची पहिली प्रचारसभा होणार असून, त्यानंतर मनसेच्या प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे.
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता राज्यातील राजकीय वातावरण तापवलं होतं. आता विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं पुन्हा एकदा राज यांची ठाकरी तोफ धडाडणार आहे. मध्यंतरी मनसे काँग्रेस आघाडीत सहभागी होऊन निवडणूक लढवेल अशी चर्चा रंगली होती; परंतु काँग्रेसकडून मनसेला सोबत घेण्याबाबत सकारात्मकता न दर्शविल्याने ही चर्चा मागे पडली; मात्र त्याचवेळी ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधात घेतलेली जाहीर भूमिका व त्यातून त्यांनी अन्य पक्षांना विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा गळ घातला होता. त्यावेळी मनसे निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा होती.
परंतु आता मनसे निवडणूक लढविणार असल्याचा स्पष्ट संदेश राज ठाकरेंनीच दिला असून, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा उत्साह संचारला आहे. मनसेने विधानसभा निवडणूक लढविण्याबाबतची तयारी सुरू करत प्रत्येक जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांनी जाऊन इच्छुकांच्या मुलाखती घेण्याबरोबरच विधानसभा मतदारसंघनिहाय राजकीय परिस्थिती जाणून घेतली आहे. त्यानुसार मनसे निवडणुकीच्या रिंगणात आपले उमेदवार उतरवणार आहे.