महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस बजावल्यानं मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. ठाणे बंद, कल्याण बंदचं आवाहन त्यांनी केलं आहेच; पण २२ तारखेला - राज यांची चौकशी आहे त्या दिवशी अतिमहत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा, असा सूचक इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कान खेचले आहेत.
राज ठाकरे जर खरे असतील, तर त्यांनी आपली सत्यता ईडीपुढे जाऊन सांगावी. निर्दोष असल्याचं सिद्ध करावं. उगाच बंद पुकारून नागरिकांना, सामान्य लोकांना त्रास का देता?, अशी चपराक मुख्यमंत्र्यांनी लगावली आहे. तसंच, कायदा हातात घेणारे कार्यकर्ते कुठल्याही पक्षाचे असले तरी त्यांच्यावर कारवाई होणारच, असंही त्यांनी ठणकावलं आहे.
कोहिनूर मिल व्यवहार प्रकरणी राज ठाकरेंना ईडीने नोटीस बजावल्यानं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय. २२ ऑगस्टला राज ठाकरेंना ईडीपुढे हजर राहायचं आहे. राज ठाकरेंवर प्रेम करणारे कार्यकर्ते त्या दिवशी उत्स्फूर्तपणे बाहेर पडतील, त्यामुळे काय घडेल सांगता येत नाही, असं सूचक विधान मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी केलंय. अतिमहत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा, असंही त्यांनी म्हटलंय. परंतु, जनतेला वेठीस न ठरण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी मनसेला दिला आहे.
राज ठाकरेंना ईडीची नोटीस आलीय, या संदर्भात तुम्हाला जेवढी माहिती आहे, तेवढीच मला आहे. कारण, ईडीचं काम स्वतंत्रपणे सुरू असतं. त्यांच्याशी आमचा संबंध नाही. त्यामुळे राज यांना नेमकी कशासाठी नोटीस आलीय याबद्दल मी अनभिज्ञ आहे. ईडीच्या चौकश्या सुरूच असतात. त्यात सूडबुद्धीचा संबंध कुठे आला? चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी मनसेचा आरोप फेटाळून लावला आहे. मात्र, येत्या काळात या विषयावरून बरीच चकमक होण्याची चिन्हं आहेत.