"श्रद्धा-अंधश्रद्धेतून बाहेर या, डोकी हलवा जरा"; गंगेचं पाणी पिण्यास राज ठाकरेंनी का दिला नकार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 17:15 IST2025-03-09T17:12:07+5:302025-03-09T17:15:22+5:30
राज ठाकरे यांनी अंधश्रद्धा आणि गंगेच्या दूषित पाण्यावर भाष्य करताना सुनावलं. गंगेचं पाणी आणलं होतं, पण मी ते प्यायलो नाही, असेही त्यांनी सांगितले.

"श्रद्धा-अंधश्रद्धेतून बाहेर या, डोकी हलवा जरा"; गंगेचं पाणी पिण्यास राज ठाकरेंनी का दिला नकार?
Raj Thackeray on Ganga River: "बाळा नांदगावकर माझ्यासाठी गंगेचं पाणी घेऊन आले होते. पण, मी म्हणालो हड, कोण पिणार ते पाणी. पूर्वीच्या काळी ठीक होतं. आता सोशल मीडियावर बघितलं. लोक त्यात अंग घासून अंघोळ करताहेत. कोण पिणार ते पाणी? डोकी हलवा, जरा अंधश्रद्धेतून बाहेर या", अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंगेतील दूषित पाण्याबद्दल भाष्य केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १९वा वर्धापन दिन रविवारी पार पडला. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. याचवेळी त्यांनी गंगेतील दूषित पाणी तीर्थ म्हणून प्राशन केलं गेलं, त्यावरूनही सुनावलं.
गधड्यानो, पापं कशाला करता?
राज ठाकरे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले, "काल मला सांगिलं कुणीतरी. मुंबई बैठक लावली होती. काही शाखाध्यक्ष आणि पदाधिकारी हजर झाले नाहीत. मग जे हजर झाले नाहीत, त्यांची हजेरी घेतली. आणि मग प्रत्येकाला विचारलं. त्यातल्या पाच-सहा जणांनी सांगितलं, साहेब कुंभला गेलो होतो. म्हटलं गधड्यानो पापं कशाला करता? मी हेही विचारलं की, अंघोळ केलीस ना?"
नांदगावकरांनी गंगेचं पाणी आणलं, मी म्हटलं हड मी नाही पिणार?
"आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून पाणी घेऊन आले. म्हटलं हड, मी नाही पिणार. आता तो सोशल मीडिया आलाय. पूर्वीच्या काळी ठिक होतं. मी त्या सोशल मीडियावर बघतोय माणसं, (अंघोळ करतानाची नक्कल करत) घासताहेत. आणि बाळा नांदगावकर साहेब, गंगेचं पाणी. अरे कोण पिणार ते पाणी?", असे राज ठाकरे म्हणाले.
"आताच कोरोना गेलाय, कुणाला त्याचं देणं-घेणं नाही. दोन वर्ष तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन अंघोळ करताहेत. मी असे कित्येक स्वीमिंग पूल बघितले जे उद्घाटनाला निळे होते. हळूहळू हिरवे झाले. कोण जाऊन पडेल त्यात. त्या गंगेत? त्याने तिथे काही केलंय आणि मी इथे तीर्थ प्राशन करतोय", असं व्यंगात्मक भाष्य ठाकरेंनी केले.
डोकी हलवा जरा, अंधश्रद्धेतून बाहेर या -राज ठाकरे
"श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही. एक नदी या देशातील स्वच्छ नाही. एक नदी. आम्ही काय, नदीला माता... परदेशात अनेकदा आम्ही जातो, तिकडे स्वच्छ नद्या. ते काही तिकडे माताबिता म्हणत नाहीत. तरी नद्या स्वच्छ. आमच्याकडे सगळं प्रदूषित पाणी. कोणी अंघोळ करतंय, कोणी कपडे धुताय. काय वाटेल ते चालू आहे. या सगळ्या अंधश्रद्धा-श्रद्धेतून जरा बाहेर या सगळ्यांनी. डोकी हलवा नीट", अशी चिंता राज ठाकरे यांनी भारतातील दूषित नद्यांबद्दल व्यक्त केली.