Join us

मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 7:15 AM

मनसे पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत मतदारसंघनिहाय अहवाल राज ठाकरे यांना दिला.

मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याची तयारी मनसेने सुरू केली असून, २२५ मतदारसंघांत उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थ या आपल्या निवासस्थानी सोमवारी सकाळी नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे शहर आणि ग्रामीण मतदारसंघांचा आढावा घेतल्याचे सांगण्यात येते. 

मनसे पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत मतदारसंघनिहाय अहवाल राज ठाकरे यांना दिला. मुंबईतील ३६, ठाण्यातील २४, पुणे ग्रामीण ११ आणि पुणे शहरातील आठ जागांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. कुणाला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी द्यायची आणि किती जागा लढवायच्या याबाबत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, असे सूत्रांनी सांगितले.

अमित ठाकरेंबाबत सहमती 

मनसे नेते अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते. त्याबाबतही बैठकीत विचार विनिमय झाला. अमित ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याबाबत पदाधिकाऱ्यांनी एकमताने सहमती दर्शवली, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोण?

ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कोणाला उमेदवारी द्यायची याची चर्चा या बैठकीत झाली नसल्याची माहिती हाती आली आहे. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून मनसेचे नेते आणि लेखक-दिग्दर्शक अभिजित पानसे यांचे नाव ठाणे विधानसभा क्षेत्रातील निरीक्षकांच्या अहवालात आहे. या मतदारसंघात गेल्यावेळी मनसे उपाध्यक्ष महेश कदम यांनी २५ हजार मते मिळवली होती.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४राज ठाकरेमनसे