Join us

राज ठाकरे माझी कॉपी करताहेत; प्रकाश आंबेडकरांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 2:19 PM

राम मंदिराच्या मुद्द्यावरून दंगली घडवण्याचा कट रचला जातोय, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात शब्दयुद्ध सुरू झालंय.

ठळक मुद्देराम मंदिराच्या मुद्द्यावरून दंगली घडवण्याचा कट रचला जातोय, या राज ठाकरेंच्या आरोपावरून शब्दयुद्धराज ठाकरे जे बोलताहेत ते आपण आधीच बोललोय, प्रकाश आंबेडकरांचा टोलादादर स्थानकाचं नाव बदलण्यास प्रकाश आंबेडकरांचा विरोध

मुंबईः लोकसभा निवडणुकीआधी राम मंदिराच्या मुद्द्यावरून दंगली घडवण्याचा कट रचला जातोय, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात शब्दयुद्ध सुरू झालंय. परंतु, या कटाबद्दल आपण आधीच बोललो होतो, राज ठाकरे माझी कॉपी करत आहेत, असा टोला भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज लगावला. 

'राम मंदिराच्या मुद्द्यावर दंगल घडवायची आणि समाजात भय निर्माण करायचे. त्यातून पुन्हा सत्ता मिळवायची, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या महिन्यात वंचित बहुजन आघाडीच्या पुण्यातील सभेत केला होता. नेमका हाच विषय राज ठाकरे यांनी विक्रोळी येथील सभेत मांडला. ओवैसी बंधूंच्या मदतीने राम मंदिराच्या मुद्द्यावरून हिंदू-मुस्लिम दंगलीचा कट रचला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यावरून शिवसेनेनं आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी राज यांची खिल्ली उडवलीय. आता प्रकाश आंबेडकर यांनीही राज यांच्यावर 'कॉपी'चा शिक्का मारलाय. त्यामुळे आता राज ठाकरे विरुद्ध प्रकाश आंबेडकर यांच्यातही खटका उडू शकतो.  

दादरला बाबासाहेबांचं नाव नको!  

मुंबई उपनगरीय रेल्वेवरील दादर स्थानकाचं नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असं करण्याची मागणी भीम आर्मीने केली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी तसे स्टीकर्स दादर स्टेशनात चिकटवले. या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांना विचारलं असता, दादरचं नाव दादरच राहू द्यावं, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. सँडहर्स्ट रोड, कुलाबा, माहिम, दादर ही नावं तशीच राहिली पाहिजेत. या नावांमागे एक इतिहास आहे. सात बेटांची मुंबई अखंड करण्यात ज्यांचं योगदान होतं, ज्या माणसांमुळे मुंबई झाली ती नावं कायम राहिली पाहिजेत, असं मत त्यांनी व्यक्त केलं. त्यामुळे दादरच्या नामकरणावरून आंबेडकरांच्या अनुयायांमध्येच दुमत असल्याचं पाहायला मिळतंय. 

टॅग्स :राम मंदिरडॉ. बाबासाहेब आंबेडकरप्रकाश आंबेडकरराज ठाकरे