Join us

राज ठाकरे, शेट्टी यांच्यात पुन्हा राजकीय खलबतं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 3:47 AM

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही नेत्यांमधील ही दुसरी भेट असल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गुरूवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजी पार्क येथील कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही नेत्यांमधील ही दुसरी भेट असल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली.भाजप-शिवसेना यांच्या विरोधात महाआघाडी तयार करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. सर्व भाजपविरोधी पक्षांचा पर्याय निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठीच राज ठाकरे यांची भेट घेतली. महाआघाडीत मनसेच्या समावेशाला असलेला काँग्रेसचा विरोधसुद्धा मावळेल अशी आशा आहे, असे राजू शेट्टी यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. दरम्यान, राज यांनी अद्याप आघाडीबाबत निर्णय घेतला नसल्याचे समजते. आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढायच्या की आघाडी, महाआघाडीची चाचपणी करायची याबाबत अद्याप चाचपणी सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली.लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांनी आघाडीसोबत जाणे पसंत केले होते. तर, मनसेने प्रत्यक्ष निवडणुका न लढविता मोदी-शाह यांच्याविरोधात राळ उठवली होती. मात्र निकाल लागल्यानंतर त्यांचा भ्रमनिरास झाला. दरम्यान, माध्यमांशी बोलताना शेट्टी यांनी विधानसभेच्या ४९ जागा लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. स्वत: विधानसभेची निवडणूक लढविणार नसल्याचे सांगतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सक्षम कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाईल. भाजप-शिवसेना सोडून सर्व पर्याय आमच्यासाठी खुले असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले होते.

टॅग्स :राज ठाकरेराजू शेट्टी