मुंबई
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमुळे सध्या मुंबईतील राजकीय वातावरण तापलं आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपाने मुरजी पटेल यांना रिंगणात उतरवलं आहे. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपाने ही निवडणूक लढवू नये, तसेच ऋतुजा लटके यांना पाठिंबा द्यावा असं आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केलं आहे. यावर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी स्वत:ला भाजपाच्या राजकारणात गुंतवून घेऊ नये, ही संवेदनाहीन माणसं आहेत, असं अरविंद सावंत म्हणाले आहेत.
"आता प्रचाराला सुरुवात झाली आहे. कदाचित भाजपाला लक्षात आलं असेल पराभव होईल. त्यामुळे त्यांनीच यांना सांगितलं असेल की पत्र द्या म्हणजे थेट माघार आम्हाला घेता येणार नाही. मग बोलणार राज ठाकरेंच्या शब्दाला मान देऊन माघार घेतली. या सगळ्या पळवाटा आहेत. पण दुर्दैव आहे. मला वाटतं राज ठाकरेंनी स्वत:ला भाजपाच्या राजकारणात गुंतवून घेऊ नये. कारण यांनी माणुसकी सोडलेली आहे. संवेदनाहिन माणसं आहेत ही", असं अरविंद सावंत म्हणाले.
राज ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलं पत्र“आमदार कै रमेश लटके ह्यांच्या दुर्देवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक आहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं,” असं राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केलं आहे.