'कट-पेस्ट'चं 'राज'कारण सोडून ठोस भूमिका घ्या', राज ठाकरेंना चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 10:08 AM2019-04-18T10:08:58+5:302019-04-18T10:11:29+5:30
राज ठाकरेंनी भाजपा आणि पंतप्रधान मोदी व अमित शहांविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. आपल्या भाषणात मोदींचे जुने व्हीडिओ राज ठाकरेंकडून दाखविण्यात येत आहेत.
मुंबई - शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या व्हीडिओ भाषणाबाजीला कस-पेस्टचं राजकारण म्हटलं आहे. राज ठाकरेंना आम्ही पॉझिटीव्ह गोष्टी दाखवतो, त्यांनी आमच्यासोबत त्यांचा माणूस पाठवावा, म्हणजे डिजीटल गावची दुसरी बाजू त्यांना दिसेल. तर, राज ठाकरेंनी कट पेस्टचा राजकाणार सोडावं, सलग ठोस भूमिका घ्यावी, असा सल्लाही विनोद तावडेंनी राज ठाकरेंना दिला आहे.
राज ठाकरेंनी भाजपा आणि पंतप्रधान मोदी व अमित शहांविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. आपल्या भाषणात मोदींचे जुने व्हीडिओ राज ठाकरेंकडून दाखविण्यात येत आहेत. त्यातील एका व्हीडिओत मोदींचे जवानांबद्दलचे मत दाखविण्यात येत आहे. त्यावर बोलताना तावडे म्हणाले की, ''मोदी काय म्हणाले, व्यापारी हा रिस्क घेतो, तशीच सैन्याची रिस्क असते. सैन्याकडून एकही जवान शहीद न होता, सर्जिकल किंवा एअर स्ट्राईक होणं शक्य आहे का ?. सैन्य प्लॅनिंग करुन आपलं मिशन पूर्ण करतं. व्यापाऱ्यालाही अशीच रिस्क घ्यायची असते'', असा अर्थ मोदींच्या त्या भाषणाचा होतो. त्यामुळे केवळ कट-पेस्टचं राजकारण न करता राज ठाकरेंनी ठोस भूमिका घ्यावी, असे तावडेंनी म्हटलं आहे.
मोदी, शहा यांना राजकीय क्षितिजावरून हटवा. देशाला गुलामगिरीत लोटू पाहणाऱ्या मोदी आणि अमित शहा या जोडीपासून महाराष्ट्र बेसावध राहिला तर लोकांचं जीणं हराम होईल, अशी भीती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारीही व्यक्त केली. सातारा शहरातील गांधी मैदानावर आयोजित जाहीर सभेत राज म्हणाले, पाच वर्षांत मोदी व अमित शहा यांनी जो गोंधळ घालून ठेवला आहे, त्यामुळे देश पूर्णपणे अडचणीत आला आहे. देशातील साडेपाच कोटी लोकांना मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे बेरोजगार व्हावे लागले. याच पाच वर्षांत 14 हजार शेतकऱ्यांनी सरकारी धोरणांना कंटाळून आत्महत्या केल्या. देशातील अत्याचार थांबलेले नाहीत. तरुणांच्या हातचे काम काढून घेतले गेले, असा आरोपही राज यांनी केला आहे. त्यावर, विनोद तावडेंनी प्रतिक्रिया दिली.