Raj Thackeray: राज्य सरकारनं दहीहंडी साजरी करण्यासाठी घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुंबई, ठाण्यात आज ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांकडून सरकारचे नियम झुगारुन दहिहंडी फोडली जात आहे. यात मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावरुनच राज ठाकरे यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. "जनआशीर्वाद यात्रा यांना चालते. त्यात कोरोना पसरत नाही. पण सण चालत नाहीत. कोरोना फक्त सणांमधूनच पसरतो का?", असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
राज्यातील लोकांना कोरोनाची भीती घालून घाबरविण्याचं काम सरकार करतंय असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. "कसला लॉकडाऊन आहे? कुठं आहे लॉकडाऊन? सारं व्यवस्थित सुरू आहे. बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावर येणाऱ्या बिल्डरांच्या गाड्या कमी झालेल्या दिसत नाहीत. त्या काही कमी झालेल्या नाहीत. फक्त लोकांना कोरोनाच्या नावानं भीती घालायचं काम सरकार करत आहे. लॉकडाऊन आवडे सरकारला अशी परिस्थिती या सरकारची झाली आहे", असं राज ठाकरे म्हणाले.
'तो' फेरीवाला जेलमधून बाहेर निघताच चोपणार, भीती काय असते दाखवून देऊ: राज ठाकरे
राज ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे:
>> थर लावू नका मग काय खुर्चीवर उभं राहून दहिहंडी फोडायची का?, राज ठाकरे यांचा राज्य सरकारला टोला
>> लॉकडाऊन आवडे सरकारला अशी परिस्थीती सध्या झालीय. त्यामुळे दुसरी लाट, तिसरी लाट, चौथी लाट हे असं मुद्दाम आणलं जातंय
>> भास्कर जाधवांच्या मुलाने मंदिरात जाऊन अभिषेक केला. मग सरकारसाठी सारं उघडं आहे का?
>> महापौर बंगल्यावर येणाऱ्या बिल्डरांच्या गाड्या काही कमी झालेल्या दिसत नाहीत.
>> जोरात दहीहंडी साजरी करा. जे होईल ते होईल असं मी कार्यकर्त्यांना सांगितलं होतं.
>> जनआशीर्वाद यात्रा चालली, तेव्हा लॉकडाऊन नाही. सण आला की लॉकडाऊन, सणांनीच कोरोना पसरतो. राजकीय यात्रांनी पसरत नाही का?
>> जनतेला घाबरुन ठेवण्याचं काम सरकार करतंय.
>> अंगावर केस किती आहेत हे जसं आपण मोजत नाही. तसं आम्ही आमच्या अंगावर किती केसेस पडल्यात ते मोजत नाही.
>> मंदिरं उघडली गेलीच पाहिजेत. नाहीतर सगळ्या मंदिरांबाहेर घंटानाद करू
>> शिवसेना आज विरोधात असती तर काय केलं असतं? त्यांही हे सांगावं