ठाणे : 'प्रेम करावे तर कोणावर करावे; शिवाजी महाराजांच्या विचारांवर; गडकिल्ल्यांवर करावे' असा संदेश देत आज १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाइन डेचा मुहूर्त साधत ठाण्यातील ३०० विद्यार्थ्यांना 'शिवनेरी' किल्ल्याची सफर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ओवळा माजिवडा विधानसभेच्यावतीने घडवण्यात आली. एकीकडे शिवजयंती साजरी करण्यावर राज्य सरकारने निर्बंध लादलेले असताना ठाण्यातील मनविसेच्या या मावळ्यांनी आठवडाभर आधीच शिवनेरीवर भगवा फडकवल्याबाबदल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. मनमोकळ्या गप्पांमधून विद्यार्थी व महाराष्ट्र सैनिकांशी गड किल्ल्यांच्या आठवणी राज ठाकरे यांनी जागवल्या.
जगभर व्हॅलेंटाईन डेची धूम सुरू असतानाच आठवडाभरावर आलेल्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ओवळा माजिवडा विधानसभेच्यावतीने परिसरातील तीनशेहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनींना पुण्याच्या जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्याची सफर घडवण्यात आली. ठाण्याच्या लोकमान्यनगर परिसरातून पहाटे विविध बसेसमधून शिवनेरी किल्ल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मनविसे उप शहर अध्यक्ष संदीप चव्हाण व सचिव मयूर तळेकर यांनी ३०० विद्यार्थ्यांना नेले. यावेळी ठाणे ते पुणे असा बस प्रवास, विद्यार्थ्यांना नाश्ता, जेवण आदी सोयी उपक्रमात मोफत पुरविण्यात आल्या. यंदा या उपक्रमाचे चौथे वर्ष होते. या उपक्रमाची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना समजताच त्यांनी 'किल्ले शिवनेरी' मोहिमेच्या टीम ला आज त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी 'कृष्णकुंज' येथे आमंत्रित केले होते. विद्यार्थ्यांनी या मोहिमेत शिवनेरीवरील कोणकोणत्या स्थळांना भेटी दिल्या, याबाबत विद्यार्थ्यांकडून ठाकरे यांनी माहिती घेतली. शिवनेरी आणि महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांना दिलेल्या भेटी व येथील शिवकालीन इतिहासाबाबत विद्यार्थ्यांशी राज ठाकरे यांनी संवाद साधला.
शर्मिला ठाकरे यांनीही मनसैनिकांच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मनविसे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे, मनविसे उप शहर अध्यक्ष संदीप चव्हाण व सचिव मयूर तळेकर, प्रभाग अध्यक्ष अमोल राणे,विभाग अध्यक्ष विवेक भंडारे, उपविभाग अध्यक्ष सागर वर्तक, मंदार पाष्टे, सोमनाथ भोईटे, अरुण उंबरकर, कुश मांजरेकर, शाखाध्यक्ष निखिल येवले, आकाश मोरे, संदीप शेळके, दिपक पोळ, प्रशांत पालव, ऋषिकेश घुले, अमोल मडये, विघ्नेश शेलार आदी उपस्थित होते.