लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आगामी महापालिका निवडणुकींच्या तयारीला लागले असून मंगळवारी त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन टीम तयार करण्याच्या सूचना दिल्या.
वांद्रे येथील एम. आय. जी. क्लब येथे झालेल्या बैठकीत राज यांनी महानगरपालिकांनुसार टीम स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. आगामी काळात जिथे निवडणुका लढवायच्या आहेत अशा शहरांसाठी या टीम असतील. यात पक्षाचे नेते, सरचिटणीस, उपाध्यक्ष, कार्यकर्ते यांचा समावेश असेल. सध्या मनसेत बैठकांचे सत्र सुरू आहे. बुधवारीही कृष्णकुंज निवासस्थानी बैठक घेणार असल्याचे समजते. दरम्यान, विविध आघाड्यांच्या प्रमुखांना अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार संबंधित पदाधिकाऱ्यांनी आपले अहवाल राज ठाकरे यांच्याकडे सादर केले.राज्यात महाविकास आघाडी सरकारचा नवीन राजकीय प्रयोग सुरू झाल्यानंतर तयार झालेली राजकीय संधी साधण्यासाठी मनसेही तयारीला लागली आहे. मराठीसह विविध मुद्द्यांवर स्थानिक कार्यकर्त्यांकडून आंदोलने सुरू आहेत. त्याला राजकीय कार्यक्रमांचे स्वरूप देण्याबाबत विचार सुरू आहे. सर्व आढावा घेतल्यानंतर स्वबळावर वाटचाल की युती करायची, आदी बाबींचा विचार केला जाईल.
राज यांच्या हाताला दुखापतराज ठाकरे मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास एम.आय.जी. क्लबमध्ये दाखल झाले. त्यांच्या डाव्या हाताला प्लॅस्टर होते. सोमवारी टेनिस खेळताना दुखापत झाल्याचे समजते.