मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पक्षाचा मोठा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरेंनीमनसेच्या आतापर्यंतच्या आंदोलनांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी मनसेकडून आंदोलनाची पुस्तिका काढणार असल्याची माहिती राज ठाकरेंनी यावेळी दिली. तसेच, मुंबई महापालिका निवडणुकांवरही भाष्य केले.
निवडणुकीचे वातावरण नाही...राज ठाकरे म्हणाले की, 'मला सध्या वातावरणात निवडणुका दिसत नाहीयेत. जानेवारीत लागेल, फेब्रुवारीत लागेल की, मार्चमध्ये लागेल, माहित नाही. या गटाला मान्यता मिळणार की, नाही मिळणार. नेमकं पुढे काय होणार, हे मला माहित नाहीये. पण, साधारण मार्चपर्यंत निवडणुका लागू शकतात,' असा दावा त्यांनी केला.
मनसेच्या आंदोलनचा स्ट्राइक रेट सर्वाधिकराज ठाकरे पुढे म्हणाले की, 'आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन होऊन 16-17 वर्षे झाली. आजपर्यंत पक्ष म्हणून आपण जी आंदोलने केली, त्याचा स्ट्राइक रेट पाहिला, तर आपल्या आंदोलनांना इतर पक्षांपेक्षा सर्वाधिक यश मिळाले आहे. पण, काही यंत्रणा राबवल्या जातात, मनसेकडून जी-जी आंदोलने होत असतात, ती विस्मपणात कशा जातात, ते पाहिले जाते.'
मनसेविरोधात यंत्रणा राबवल्या'मनसेने टोलनाक्यांविरोधात आंदोलन केले, त्यानंतर 65-67 टोलनाके बंद झाले. ज्यांनी फक्त निवडणुकीमुळे टोलनाके बंद करू असे म्हणाले होते, त्यांनी पुढे काहीही केले नाही. पण, त्यांना प्रश्न विचारत नाहीत, तर आम्हाला विचारतात. यासाठीच मी एक पुस्तिका काढतोय, ज्यात मनसेने केलेल्या सर्व यशस्वी आंदोलनाची माहिती दिली जाईल,' अशी माहिती राज ठाकरेंनी यावेळी दिली.