Raj Thackeray: सुजात आंबेडकरांना अनुल्लेखाने मारले, आदित्यही राज ठाकरेंच्या यादीत नव्हतेच!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 10:17 AM2022-04-13T10:17:45+5:302022-04-13T10:19:37+5:30
राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यापासून राजकीय नेत्यांच्या टीकेला प्रत्त्युतर दिलंय
मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरेंच्या गुढी पाडवा मेळाव्यातील भाषणानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगला वाद निर्माण झाला होता. भाजप नेत्यांनी राज यांच्या भाषणाचे समर्थन केले होते. मात्र, मशिदीवरी भोंग्यांच्या मुद्द्यावरुन हे भाषण वाद्रगस्त ठरलं होतं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, संजय राऊत यांच्यापासून ते अगदी युवा नेते आदित्य ठाकरे, सुजात आंबेडकरांपर्यंत अनेकांनी मनसेवर टीका केली. ठाण्यातील उत्तर सभेत राज यांनी टीका करणाऱ्यांची यादी वाचत त्यांच्यावर पलटवार केला.
राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यापासून राजकीय नेत्यांच्या टीकेला प्रत्त्युतर दिलंय. राज यांनी कागदावर लिहून एक यादीच आणली होती. त्यामध्ये, शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, लाकडे अजित पवार, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत यांची नावेच लिहून आणली होती. आपल्या पाडव्या मेळाव्यातील भाषणानंतर या नेत्यांनी राज यांच्यावर टीका केली होती. या टिकेचा समाचार राज ठाकरेंनी उत्तर सभेतून घेतला. मात्र, राज यांच्या यादीत दोन नावे दिसलीत नाहीत किंवा त्या दोन नेत्यांबद्दल त्यांनी अक्षरही काढले नाही.
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंच्या भाषणावर बोचरी टीका केली होती. राज ठाकरेंनी अगोदर अमित ठाकरेंना हनुमान चालिसा म्हणायला लावावी, अमित ठाकरेंना अगोदर रस्त्यावर उतरवावे मग बहुजनांच्या पोरांना, असे म्हणत टीका केली होती. तर, आदित्य ठाकरेंनी संपलेल्या पक्षाबद्दल मी काय बोलणार, असे म्हणत मनसेला टोला लगावला होता. राज यांनी आपल्या भाषणात या दोन्ही युवक नेत्यांवर पलटवार केला नाही. मात्र, संपलेला पक्ष म्हणत टिका करणाऱ्या जयंत पाटलांना ही गर्दी पाहा.. असे म्हणत प्रत्युत्तर दिले होते. तर, माझ्यावरही गुन्हे दाखल आहेत, आम्ही 3 मे नंतर काय ते दाखवू, असे राज यांनी म्हटले होते. त्यांनी आपल्या भाषणात कुठेही सुजात आंबेडकर आणि आदित्य ठाकरेंचा उल्लेखही केला नाही.