मुंबई - मुंबईसह देशभरात घुसलेल्या घुसखोरांविरोधात मनसेने आज मुंबईत महामोर्चा काढून शक्तिप्रदर्शन केले. या मोर्चानंतर झालेल्या सभेत मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी सीएए आणि एनआरसीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच या कायद्याला विरोध करणाऱ्यांनाही त्यांनी जोरदार टोला लगावला. सीएए, एनआरसी कायद्याची माहिती नसणारेही या कायद्यावर टीका करत आहेत, असे राज ठाकरे म्हणाले. आज दुपारी हिंदू जिमखाना येथून सुरू झालेल्या मनसेच्या महामोर्चाचे आझाद मैदानामध्ये सभेत रूपांतर झाले. त्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केले. ''आज तुम्ही जी ताकद दाखवली त्यासाठी मी शतश: ऋणी आहे, मोर्चाला उत्तर मोर्चानेच असेल, असे मीसांगितले होते, त्यांना चोख उत्तर दिले. अनेकांना सीएए आणि एनआरसीबाबत माहितीही नाही. सीएए, एनआरसीवर कायद्याची माहिती नसणारेही टीका करताहेत. व्हॉट्सअपवर मेसेज पसरवले जातात. या कायद्यांबाबत मी माहिती घेतली. जे जन्मापासून इथे राहतायेत त्यांना थोडी बाहेर काढणार आहेत? जे कायद्यात नव्हतेच तर मग कोणासाठी ही ताकद दाखवली? घुसखोरांना हाकललेच पाहिजे त्यात तडजोड होऊच शकत नाही.''
दरम्यान, ''आज मोर्चाला मोर्चाने उत्तर दिले आहे. यापुढे दगडाला दगड आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिले जाईल. इतर देशापेक्षा भारताने तुम्हाला इतकं स्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे एकोप्याने राहा, देशाशी वाकडं घेऊ नका,'' असा सज्जड इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.