राज ठाकरेंचा दिल्लीश्वरांवर निशाणा; मुंबई-महाराष्ट्रावर परखड भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 06:30 PM2024-01-06T18:30:03+5:302024-01-06T18:44:26+5:30

आताचे सरकार ही सहकार चळवळ नाहीय, तर सहारा चळवळ आहे. राज्यात दोन लाखांच्यावर सहकारी संस्था आहेत. त्यानंतर, भाजपा आणि गुजरात ज्यांचा महाराष्ट्रावर डोळा आहे.

Raj Thackeray Targets Delhishwars central government; Critical commentary on Mumbai-Maharashtra | राज ठाकरेंचा दिल्लीश्वरांवर निशाणा; मुंबई-महाराष्ट्रावर परखड भाष्य

राज ठाकरेंचा दिल्लीश्वरांवर निशाणा; मुंबई-महाराष्ट्रावर परखड भाष्य

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज कर्जत येथे पदाधिकाऱ्यांना संबोधित करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या तिसऱ्या वार्षिक सहकार परिषदेसाठी नेरळजवळील धामोते येथे असलेल्या डिस्कव्हर रिसोर्टमध्ये ६ आणि ७ जानेवारी हे शिबिर होत आहे.  मनसेच्या सहकार विभागाचे दोनशे पदाधिकारी आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष यांची उपस्थिती असणार आहे. या शिबिरातून राज ठाकरेंनी महाराष्ट्राची सहकार चळवळ समजावून सांगताना राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. तर, दिल्लीश्वरांवरही हल्लाबोल केला. 

आताचे सरकार ही सहकार चळवळ नाहीय, तर सहारा चळवळ आहे. राज्यात दोन लाखांच्यावर सहकारी संस्था आहेत. त्यानंतर, भाजपा आणि गुजरात ज्यांचा महाराष्ट्रावर डोळा आहे. आपल्याकडची महानंदा डेअरी जातेय का राहतेय याची कल्पना नाही. ती अमूल गिळंकृत करतेय का असा प्रश्न पडलाय, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. राज यांनी राज्यातील सहकार चळवळीवर भाष्य करताना महात्मा फुलेंचं उदाहरण दिलं. तर, दिल्लीश्वर म्हणत केंद्रातील मोदी सरकारवरही निशाणा साधला.

ज्या निष्ठुरपणे देशातील राजकारण सुरु आहे, ज्याप्रकारे न्यायव्यवस्था सुरु आहे. त्यानुसार उद्या ते मुंबईला हात घालायला मागे-पुढे बघणार नाहीत. महाराष्ट्राचे तुकडे करायला, विदर्भ वेगळा करायला वेळ लावणार नाहीत. हे का होतंय? कारण हा मरहट्ट्यांचा प्रदेश जसं दिल्लीचं तख्त राखू शकतो तसं ते उलथवून पण टाकू शकतो ह्याची भीती दिल्लीश्वरांना सतावत असते... त्यामुळे महाराष्ट्र दुबळा होणे त्यांच्यालेखी महत्त्वाचं आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. 

आपण इतिहास विसरत चाललो आहोत, मोबाईलच्या क्लीपमध्ये आणि टीव्हीवरील सिरियलमध्ये अडकून पडत आहोत. मराठ्यांनी अटकेपार झेंडा रोवलाय, या देशाचा पंतप्रधान मराठी माणसानेच बसवलाय, असे म्हणत राज ठाकरेंनी पदाधिकारी शिबिरात मार्गदर्शन करताना, सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. तर, सर्वसामान्यांनाही जागरुक होण्याचं आवाहन केलं. 
 

Web Title: Raj Thackeray Targets Delhishwars central government; Critical commentary on Mumbai-Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.