मुंबई-
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत स्वबळावर लढण्याची तयारी करा, मनसेकडे लोक पर्याय म्हणून पाहत आहेत असा संदेश कार्यकर्त्यांना दिला. तसंच शिवसेनेतील सध्याच्या परिस्थितीवर बोलताना त्यांनी महत्वाचं विधान केलं. शिवसेनेला लोकांमध्ये सहानुभूती मिळते आहे हा भ्रम आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
'६ एम'वर लक्ष केंद्रीत करा; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
"शिवसेनेला लोकांमध्ये सहानुभूती मिळते आहे हा भ्रम आहे. लोक सध्याच्या राजकीय परिस्थितीला कंटाळले आहेत. लोक आपल्याकडे पर्याय म्हणून पाहात आहेत. त्यामुळे सकारात्मक विचार ठेवा. मी तुम्हालाच खुर्चीवर बसवणार, मी स्वत: सत्तेच्या खुर्चीवर उडी मारुन बसणार नाही", असं म्हणत राज ठाकरे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. लवकरच आपण सत्तेच्या खुर्चीवर असू आणि आपल्यापैकी एक कार्यकर्ता त्या खुर्चीवर असेल, असा विश्वास राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच पदाधिकाऱ्यांना स्वबळावर लढणाची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.
कार्यकर्त्यांना दिला सहा 'M' चा फॉर्म्युलामनसे प्रमुख राज ठाकरेंनी आजच्या बैठकीत '६ एम'चा फॉर्म्युला कार्यकर्त्यांना देत त्यावर लक्ष केंद्रीत करा असं म्हटलं. हे ६ एम म्हणजे मेसेज, मेसेंजर, मनी, मसल, माईंड आणि मॅकेनिक असं त्यांनी म्हटलं. मॅकेनिक म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करा. मेसेज म्हणजे आपले विचार मेसेंजरच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवावे. मसल म्हणजे आपल्या ताकदीने लोकांपर्यंत जात आपले विचार त्यांच्यापर्यंत घेऊन जा आणि मनी लागेल तो आपण उभा करू, निवडणूक जिंकू असं बैठकीत सांगितले.
सध्याच्या परिस्थितीवर भाष्य न करण्याचे दिले होते आदेशशिंदे आणि ठाकरे गट एकमेकांविरोधात उभे ठाकल्यानंतर निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्षाचं नाव तसंच धनुष्यबाण निवडणूक चिन्ह तात्पुरतं गोठवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजकीय क्षेत्रात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. याच वेळी राज ठाकरे यांनी तातडीनं पुढाकार घेत आपल्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच प्रवक्त्यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीवर कोणत्याही प्रकारचं भाष्य करु नये, लवकरच मी आपली भूमिका तुमच्यासमोर मांडेन असं म्हटलं होतं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"