Join us

"मला त्या गोष्टीचा पश्चात्ताप..."; राज ठाकरेंनी सांगितले आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार न देण्याचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 2:43 PM

मनसे नेत्यांच्या बैठकीत अमित ठाकरेंनी निवडणूक लढवण्याचे ठरवण्यात आल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Raj Thackeray : माहीम विधानसभा मतदारसंघातून यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात अमित ठाकरे यांच्यासमोर विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाच्या महेश सावंत यांचे आव्हान असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अमित ठाकरे पहिल्यांदाच उतरले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नव्हता. मात्र यावेळी चित्र उलट आहे. यावरुन राज ठाकरे यांनी मी ती गोष्ट चांगल्या विचारांनी केली होती असं स्पष्टीकरण दिलं आहे. अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवणार असल्याने त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. भाजपही अमित ठाकरेंसाठी आग्रही आहे. दुसरीकडे अमित ठाकरे निवडणूक लढवणार असल्याने ठाकरे गट तिथे उमेदवार देणार की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष होतं. शेवटी ठाकरे गटानेही महेश सावंत यांना उमेदवारी देत ही लढत तिरंगी केली आहे. मात्र आदित्य ठाकरेंच्या पहिल्या निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे यांनी वरळी मतदारसंघात उमेदवार न देता त्यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला होता. अमित ठाकरेंच्या वेळीही तसेच होईल अशी चर्चा होती. मात्र उद्धव ठाकरेंनी माहीम मतदारसंघात उमेदवारी दिली. या सगळ्या प्रकरणावरुन राज ठाकरे यांनी आता भाष्य केलं आहे.

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविषयी प्रतिक्रिया दिली. "मनसे नेत्यांच्या बैठकीत अमित ठाकरेंनी निवडणूक लढवण्याचे ठरवण्यात आले. त्या बैठकीत मी नव्हतो. पक्षातल्या लोकांनी निवडणुका लढवल्या पाहिजेत असं माझं मत आहे असं अमित ठाकरेंनी सांगितले. त्यानंतर मी त्याला विधानसभेच्या कामकाजाविषयी समजावून सांगितलं आणि त्यावेळी त्याने निवडणूक लढणार असल्याचे म्हटलं," असं राज ठाकरे म्हणाले.

"आदित्यच्या वेळी मी विचार केला होता की माझ्या विरोधातला पक्ष असला तरी मी राजकारण आणि नातेसंबंध याच्यामध्ये काहीतरी बघत असतो. तिथे आमची ३८-३९ हजार मते असून देखील मला असं वाटलं की तो पहिल्यांदा निवडणूक लढवत आहे आपण उमेदवार नको द्यायला. हा माझा विचार झाला. मी जसा सुज्ञपणे विचार करतो  तसा समोरचा विचार करेल अशी अपेक्षा मी नाही ठेवत. मी ती गोष्ट चांगल्या विचारांनी केली. समोरच्याला वाटत नसेल तर त्यांनी करू नये. मी त्यावेळी कोणाला फोन करून उमेदवार उभा करणार नाही असं सांगितलं नव्हतं. मला असं करा कोणी सांगितलं नव्हतं. मला त्या गोष्टीचा पश्चाताप नाही. हा प्रत्येकाच्या स्वभावाचा भाग झाला," असं राज ठाकरे यांनी म्हटलं. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४राज ठाकरेउद्धव ठाकरेआदित्य ठाकरे