Join us

Raj Thackeray: हमारे कार्यकर्ता का धरपकड्या, राज ठाकरेंनी चक्क हिंदीतून मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 1:40 PM

राज ठाकरे यांनी चक्क हिंदीतही पत्रकार परिषद घेतली. भोंगा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी 1 वाजता त्यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली.

मुंबई - मशिदीवरील भोंग्यांचा विषय काही एक दिवसाचा नाही. जोपर्यंत मशिदीवरील भोंगे खाली उतरवले जात नाहीत तोवर आमचं आंदोलन सुरुच राहणार आहे, अशी रोखठोक भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मनसेकडून आज राज्यात मशिदींसमोर हनुमान चालीसा पठणाच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी, प्रथमच त्यांनी हिंदीत भूमिका मांडली. तत्पूर्वी मराठीतही पत्रकारांशी संवाद साधला. 

Raj Thackeray ...तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार, भोंग्यांचा विषय एक दिवसाचा नाही; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं!

राज ठाकरे यांनी चक्क हिंदीत पत्रकार परिषद घेतल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. भोंगा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी 1 वाजता त्यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेची सुरुवात नेहमीप्रमाणे त्यांनी मराठीतच केली. यावेळी, आपली बाजू मांडल्यानंतर त्यांनी हा प्रश्नोत्तराचा तास नाही, असे म्हणत प्रश्न टाळले. त्यानंतर, राज ठाकरेंना हिंदीत बोलण्याची विनंती पत्रकारांनी केली. त्यावेळी, माझं हिंदी एवढं चांगलं नाही रे... असे म्हणत त्यांनी हिंदीतही आपले मुद्दे मांडले. 

अनधिकृत मशिदींमधील भोंगे अधिकृत कसे?, नांगरे पाटलांचा फोन अन् राज ठाकरेंचा सवाल!

हमारे कार्यकर्ता का धरपकड्या जो चल रहा है... असे म्हणत राज यांनी हिंदीतही भूमिका मांडली. विशेष म्हणजे मंगळवारी राज यांनी 4 मे च्या आंदोलनासंदर्भातील भूमिका पत्राद्वारे जाहीर केली होती. हे पत्रही तीन भाषेत देण्यात आले होते. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत राज यांनी आपली भूमिका जाहीर करत, देशातील तमाम हिंदूंना आवाहन केलं होतं. त्यानंतर, आज पहिल्यांदाच त्यांनी पत्रकारांसमोर हिंदीत आपली भूमिका मांडल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

त्यानंतर प्रथमच हिंदीत बोलले राज 

राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा घेऊन मनसेच्या माध्यमातून आपलं आक्रमक राजकारण सुरू केलं होतं. त्यावेळी, परप्रांतीय विरुद्ध मराठी अशीच राज यांची भूमिका दिसून येत होती. मराठीचा मुद्दा घेतल्याने राज हे मराठीतच बोलत, विशेष म्हणजे पत्रकारांनी हिंदीत विचारलेल्या प्रश्नांनाही ते मराठीतच उत्तर देत होते. इंडिया टुडेला एकदा त्यांनी मुलाखत दिली होती, अर्णब गोस्वामी यांनी ही मुलाखत घेतली होती, त्यावेळी त्यांनी हिंदीत उत्तरे दिली. माझी भूमिका हिंदी भाषिकांना, परप्रांतियांना कळावी, यासाठी मी हिंदीत बोलत असल्याचं राज यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, आज पहिल्यांदाच त्यांनी हिंदीत भूमिका मांडली. एकूणच आंदोलनास महाराष्ट्राबाहेर मिळत असलेला प्रतिसाद आणि राज यांच्या देशपातळीवर होत असलेल्या चर्चेच्या आवेशात त्यांनी चक्क हिंदीत भूमिका मांडली. 

मुंबईत १३५ मशिदींवर आज पहाटेची नमाज - राज

"मला मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत ११४० मशिदी आहेत आणि त्यापैकी आज १३५ मशिदींवर पहाटे अजान लावण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या नियमाचा भंग या मशिदींकडून झालेला आहे. मग माझं राज्य सरकारला विचारणा आहे की तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पकडत आहात. मग या मशिदींवर कारवाई करणार आहात की नाही?", असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. 

विश्वास नांगरे पाटलांचा फोन

मुंबईचे पोलीस उपायुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांचा फोन आल्याची माहिती यावेळी राज ठाकरे यांनी दिली. "विश्वास नांगरे पाटील यांनी काल फोन करुन मौलवींशी बोलणं झालं असून ते नियमानुसार अजान करतील असं आश्वासन मिळालं असल्याचं त्यांनी सांगितलं. तरीही आज मुंबईत १३५ मशिदींमध्ये पहाटेची अजान झाली आहे. नांगरे पाटील यांनी मला मशिदींनी मागितलेल्या परवानगीची माहिती दिली. पण मुळात मुंबईतील मशिदी अधिकृत तरी आहेत का? अनधिकृत मशिदींवरील भोंगे अनधिकृतच आहेत. मग त्यांना अधिकृत परवागनी कशी काय देता तुम्ही?", असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.  

टॅग्स :राज ठाकरेमनसेमशिदमुंबई