Raj Thackeray: मुंबईत राज ठाकरेंविरुद्ध बॅनर झळकला, भूमिका बदलावरुन टोला लगावला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 09:42 AM2022-04-14T09:42:29+5:302022-04-14T10:03:16+5:30
राज ठाकरेंनी हिंदुत्त्वाची भूमिका घेतल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे
मुंबई - गुढी पाडव्याच्या मेळाव्यातील सभेनंतर झालेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी मनसेने ठाण्यात उत्तरसभा (MNS Uttar Sabha in Thane) आयोजित केली. या उत्तरसभेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांचा दाखला देत, राज्य सरकारला एकप्रकारे 3 मे पर्यंतचा अल्टीमेटमच दिला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या संजय राऊतांवरही जोरदार हल्लाबोल केला. या सभेनंतरही त्यांच्यावर टिकास्त्र सोडण्यात येत आहे. आता, राज यांच्या भूमिकांवरुन मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात बॅनर झळकला आहे.
राज ठाकरेंनी हिंदुत्त्वाची भूमिका घेतल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. तर, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांवेळी भाजपवर गरजणाऱ्या राज ठाकरेंनी आता राष्ट्रवादी अन् शिवसेनेला लक्ष्य केलंय. त्यातूनच, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांकडून, समर्थकांकडून राज यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. राज यांच्या भूमिका बदलीवरुन त्यांना लक्ष्य केलं जात आहे. आता, दादरच्या शिवसेना भवनासमोर राज ठाकरेविरुद्धचा एक बॅनर झळकला आहे. या बॅनरवर तीन फोटोंची जागा आहे. मात्र, यातील एक जागा रिकामी असून तिथे प्रश्नचिन्ह देण्यात आलंय. राज ठाकरेंची पुढील भूमिका काय असेल? याबाबतचा हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
पहिल्या फोटोत राज यांच्या डोक्यावर मुस्लीम टोपी दिसून येत असून 'काल' असं येथे लिहिण्यात आलंय. दुसऱ्या फोटोत त्यांनी घेतलेल्या हनुमान चालिसाच्या भूमिकेचं चित्र दिसत आहे. त्यामध्ये, हनुमान आणि आज असं दिसून येत आहे. तर, तिसऱ्या फोटोत प्रश्नचिन्ह देण्यात आलं असून उद्या... असा शब्द लिहिण्यात आलाय.
दरम्यान, राज यांच्या भूमिका बदलण्यावरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह अनेकांनी त्यांच्यावर टिका केली आहे. आता, शिवसेना भवनासमोर बॅनरबाजीही करण्यात आली आहे. हे बॅनर कोणी लावले हे अद्याप स्पष्ट नाही, मात्र बॅनर आता काढण्यात आले आहेत. बॅनर कोणी लावले याचा तपास पोलीस करत आहेत.