मुंबई - गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी शिवसेना-राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या सर्व वातावरणात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी आनंदाचा सोहळा सुरू झाला. मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांना पुत्ररत्न झाल्याने ठाकरे कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. आदित्य ठाकरेंनी रविवारी त्यांच्या बाळाचा फोटो फेसबुकवरुन शेअर केला आहे. सध्या हा फोटो व्हायरलही झाला आहे. फोटोसोबत केवळ हर्टचे इमोजी शेअर करण्यात आले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजोबा झाले असून अमित ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. राज ठाकरेंना नातू झाला ही बातमी कार्यकर्त्यांमध्ये पसरताच मोठा उत्साह साजरा करण्यात आला. मंगळवारी सकाळी राज ठाकरेंची सून मिताली ठाकरे यांनी गोंडस बाळाला जन्म दिला आहे. मुंबईतील ब्रीच कँन्डी हॉस्पिटलमध्ये आई-मुलगा दोघंही सुखरुप आहेत. अमित ठाकरेंना पुत्ररत्न झाल्याचं समजताच शिवतीर्थावर पेढे वाटप करण्यात आले. नातवाच्या आगमनाने राज ठाकरे आजोबा तर शर्मिला ठाकरे या आजी झाल्या आहेत.
२ वर्षांपूर्वी झाले लग्न
२७ जानेवारी २०१९ रोजी अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांचा विवाह झाला होता. लोअर परळमधील सेंट रेजिस या हॉटेलमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. मिताली बोरूडे या फॅशन डिझायनर आहेत. त्यांनी फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचं शिक्षण पूर्ण केलंय. त्यांचे वडिलही प्रसिद्ध सर्जन आहेत. काही वर्षांपूर्वी मिताली आणि राज ठाकरे यांच्या कन्या उर्वशी ठाकरे यांनी 'द रॅक' हा कपड्यांचा ब्रँड लाँच केला होता.