'... तर पुन्हा मशिदीसमोर मोठ्या स्पीकरवर हनुमान चालिसा लावणार', राज ठाकरे कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 07:51 PM2022-11-27T19:51:17+5:302022-11-27T19:53:07+5:30
'बाळासाहेब ठाकरेंची मशिदीवरील भोंगे काढण्याची भूमिका होती, आपण ती इच्छा पूर्ण केली.'
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पक्षाचा मोठा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरेंनीमनसेच्या आतापर्यंतच्या आंदोलनांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी मनसेकडून आंदोलनाची पुस्तिका काढणार असल्याची माहिती राज ठाकरेंनी यावेळी दिली. तसेच, पुन्हा एकदा मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसेचा मुद्दा उपस्थित केला. याशिवाय, उद्धव ठाकरेंवरही टोला लगावला.
उद्धव ठाकरेंवर टोला
राज ठाकरे म्हणाले की, 'आम्ही आंदोलने करत होतो, तेव्हा फक्त हिंदुत्व-हिंदुत्व करणारे तेव्हा कुठे होते. काल-परवा तब्येतीचे कारण सांगणारे माजी मुख्यमंत्री आता कुठे आहेत...एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली...आता उद्धव ठाकरे बाहेर फिरत आहेत. स्वार्थासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा, ही कामे मी करत नाही. मराठीच्या भूमिकेवरुन असेल किंवा हिंदुत्वाच्या भूमिकेवरुन असेल, ही लोक काहीच करणार नाहीत. या उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकही खटला नाही, कारण भूमिका नाही घ्यायची. फक्त मला सत्तेत बसवा, हेच पाहिजे यांना.'
मशिदीसमोर पुन्हा हनुमान चालिसा...
'हे म्हणतात की, राज ठाकरे अचानक हिंदुत्ववादी झाले, पण मी आधीपासूनच हिंदुत्ववादी होतो. मी हिंदुत्ववादी आणि कट्टर मराठी घरात जन्माला आलोय. बाळासाहेब ठाकरेंची मशिदीवरील भोंगे काढण्याची भूमिका होती. आपण ती इच्छा पूर्ण केली. आपण काढले नाही, आवाज कमी करायला लावला. नाही काढले, तर हनुमान चालिसा लावली. अजूनही काही ठिकाणी चरबी उतरलेली नाही. जिथे-जिथे हे असले भोंगे चालू असतील, पहिली पायरी पोलिसांकडे तक्रार करायची. पोलिसांनी कारवाई केली नाही, तर त्यांच्यावर न्यायालयाचा अपमान केल्याची केस होऊ शकते. पोलिसांनी काही केले नाही, तर मोठ्या ट्रकमध्ये मोठे स्पीकर लावून हनुमान चालिसा लावा...जोपर्यंत अरे ला कार होत नाही, तोपर्यंत असंच राहणार...मला माझ्या महाराष्ट्र सैनिकांकडून अपेक्षा आहे, अशी भूमिका राज ठाकरेंनी केली.