Raj Thackeray : राज ठाकरे उद्या लीलावती रुग्णालयात दाखल होणार; १ जूनला शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 03:40 PM2022-05-30T15:40:01+5:302022-05-30T16:11:56+5:30
Raj Thackeray : उद्या राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहे. तर १ जून रोजी ही शस्त्रक्रिया पार पडणार आहे.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांच्या पायावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी राज ठाकरे हे मंगळवारी (दि.३१) लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांना पायाच्या दुखण्याचा त्रास सुरू आहे. दरम्यान, राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, पायाचे दुखणे बळावल्याने राज ठाकरे यांना अयोध्या दौरा रद्द करावा लागला होता. त्यानंतर राज ठाकरे यांच्या पायाची शस्त्रक्रिया होणार असल्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार, उद्या राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहे. तर १ जून रोजी ही शस्त्रक्रिया पार पडणार आहे.
राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना साधारण दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आपल्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली होती. याबाबत माहिती देताना राज ठाकरे म्हणाले होते की, येत्या १ तारखेला माझ्या हिप बोनची शस्त्रक्रिया आहे. हे इथे जाहीरपणे सांगतोय कारण कुणालाही न सांगता शस्त्रक्रियेला गेलो, तर आमचे पत्रकार बांधव कुठला अवयव काढतात काही नेम नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.
याचबरोबर, जवळपास ३५ वर्षे माझे वजन ६३ किलो इतकंच होते. पण त्यानंतर वजन आणि इतर गोष्टी वाढायला लागल्या. आपण आरोग्यासंदर्भातील पथ्यपाणी खूप गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. मात्र, आपण आज करु, उद्या करू, या नादात कायम टाळाटाळ करत राहतो. मला सध्या त्रास होत असल्यामुळे मला या सगळ्याची जाणीव होत आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, असेही राज ठाकरे यांनी म्हटले होते.
राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित का केला?
अयोध्या दौरा स्थगित का केला, यावर पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात बोलताना राज ठाकरे म्हणाले होते की,अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. या दौऱ्याच्या निमित्ताने एक सापळा रचला गेला. दौरा तुर्तास रद्द झाल्याने अनेकांना वाईट वाटले. बाबरीच्या वेळी अनेक कारसेवकांना मारण्यात आले. त्यांची प्रेतं फेकली गेली. मला त्यांचेही दर्शन घ्यायचे होते. मी हट्टाने जायचे ठरवले असते, तरी हजारो माझे सैनिक अयोध्येला आले असते. तिथे जर काही झाले असते तर आपली पोरं अंगावर गेली असती. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. हकनाक तुमच्यामागे ससेमिरा टाकला गेला असता. मी आपली पोरं अशी हकनाक घालवणार नाही, असेही राज ठाकरे म्हणाले होते. तसेच, ऐन निवडणुकीच्या वेळी या सर्व गोष्टी केल्या असत्या आणि निवडणुकीला याठिकाणी कुणीच नसते. माझी महाराष्ट्रातली ताकद हकनाक तिकडे सापडली असती. माझ्यावर टीका झाली तर होऊ द्या, पोरं मी अडकू देणार नाही, असेही राज ठाकरे यांनी म्हटले होते.