मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या ४ वर्षात तिसऱ्यांदा भूकंप घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारांसह ९ दिग्गज नेते सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर इतरांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपा-शिवसेना सरकारमध्ये सहभागी होण्याचा अजित पवारांचा वैयक्तिक निर्णय आहे असा दावा शरद पवारांनी केला आहे तर राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच आम्ही सत्तेत सहभागी झालोय असं अजित पवारांनी म्हटलं. मात्र या राजकीय नाट्यानंतर राज्यभरात ठिकठिकाणी प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
मुंबईतील दादर येथील शिवसेना भवनासमोर एका महाराष्ट्रसैनिकाने बॅनरबाजी केली आहे. या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला असून राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे असं आवाहन या बॅनरमधून केले आहे. दादर परिसरातील लक्ष्मण पाटील या कार्यकर्त्याने हा बॅनर लावला आहे. त्यावर लिहिलंय की, महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला, राजसाहेब-उद्धवसाहेब आता तरी एकत्र या, संपूर्ण महाराष्ट्र आपली वाट पाहतोय. एका महाराष्ट्रसैनिकाची हात जोडून कळकळीची विनंती असा मजकूर छापण्यात आला आहे.
२०१९ नंतर राज्याच्या राजकारणात सत्तापरिवर्तन झाले. भाजपा-शिवसेना यांनी युतीत निवडणुका लढवल्या त्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने भाजपाशी काडीमोड घेत थेट विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी स्थापन झाली. मात्र त्यानंतर अडीच वर्षात शिवसेनेत फूट पडली. शिवसेनेचे ४० आमदार भाजपासोबत आले. त्यानंतर महाविकास सरकार कोसळले. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. आता वर्षभरानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवारांसह ९ जणांनी बंड पुकारात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले.
राज ठाकरेंनीही केली टीका
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच! तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं. बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार? असा सवाल त्यांनी जनतेला विचारला आहे.