Raj Thackeray Ayodhya Visit: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी आज राज ठाकरे यांची 'कृष्णकुंज'वर भेट घेतली. या भेटीत राज ठाकरे यांनी अयोध्येला येण्याची बाबतची इच्छा कांचनगिरीजी यांना बोलून दाखवली. कांचन गिरीजी यांनी राज यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यातही त्यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची माहिती दिली.
"राज ठाकरे यांचा डिसेंबर महिन्यात अयोध्येत येण्याचा मानस आहे. आम्ही त्यांचं स्वागत करु. राज ठाकरे यांनी हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठीच्या कार्याला हातभार लावावा अशी विनंती आम्ही त्यांच्याकडे केली आहे. राज ठाकरे यांची हिंदू राष्ट्राबाबतची संकल्पना खूप स्पष्ट आहे", असं कांचन गिरीजी यांनी म्हटलं.
राज ठाकरे यांनीही अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात असून दिवाळीनंतर ते अयोध्या दौरा करण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्याच्या ५ तारखेला राज ठाकरेंचा अयोध्या दौरा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठी राज ठाकरेंचा अयोध्या दौरा अतिशय महत्त्वाचा आहे, असं सांगितलं जात आहे.
दरम्यान, कांचनगिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्यची यांनी राज ठाकरे यांची भेट घेण्यापूर्वी शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर ते कृष्णकुंजवर दाखल झाले. राज ठाकरेंच्या भेटीनंतर कांचन गिरीजी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे यांच्या मनात परप्रांतियांविरोधात कोणताही द्वेष नाही हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवलं, असं कांचन गिरीजी म्हणाल्या. राज ठाकरेंच्या हिंदू राष्ट्राच्या संकल्पना खूप स्पष्ट आहेत आणि स्थानिक रोजगाराच्या मुद्द्यांवर ते बोलत असतात. परप्रांतियांबद्दल कोणत्याही पद्धतीचा द्वेष मला त्यांच्या बोलण्यातून जाणवला नाही, असं त्या म्हणाल्या.