Join us

Raj Thackeray Loudspeakers, NCP: "खरं चित्र लपविण्यासाठी भोंग्यांसारख्या निरुपयोगी विषयांना महत्त्व दिलं जातंय"; राष्ट्रवादी काँग्रेसची राज ठाकरे, भाजपावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 7:02 PM

"अशा अनेक अनावश्यक गोष्टींना महत्त्व मिळत राहिल्यास..."

Raj Thackeray vs NCP on Loudspeakers: भोंग्यांसारख्या निरुपयोगी विषयांकडे जनतेचे लक्ष वेधून अर्थव्यवस्थेतील महत्वपूर्ण प्रश्नातून केंद्र सरकारची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्यामुळे अशा अनेक अनावश्यक गोष्टींना महत्त्व मिळत राहिल्यास अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणणे शक्य होणार नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाला लगावला. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीचा खरपूस समाचार गेल्या तीन सभांमध्ये घेतला. त्यानंतर आजपासून जिथे अजानचा भोंगा वाजेल, तिथे भोंग्यातून हनुमान चालीसा वाजवा, असं आवाहन त्यांनी संपूर्ण हिंदू समाजाला केलं होतं. याच मुद्द्यावर राष्ट्रवादीकडून त्यांना आणि भाजपाला उत्तर देण्यात आले.

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सातत्याने देशातील बेरोजगारीचा दर वाढत असल्याच्या बातम्या पाहायला मिळत आहेत. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे डबघाईला येऊन महागाईने उच्चांक गाठला आहे. सध्या बेरोजगारीचा दर ७.८३ टक्क्यांवर पोहोचला. अशा परिस्थितीत भोंग्यासारख्या अनावश्यक विषयाला उगाचच महत्त्व दिलं जात असल्याचं मत तपासे यांनी मांडले.

गेल्या दोन वर्षातल कोरोनाचे संकट आणि दिवसेंदिवस देशात वाढत असलेल्या महागाईमुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यास विलंब होत आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होत नाहीत. अलीकडेच, देशाची अर्थव्यवस्था सावरायला १२ वर्षे लागतील, अशी चिंता RBI ने आपल्या अहवालात व्यक्त केली आहे. त्यामुळे नको ते विषय काढून महागाई व बेरोजगारीकडे दुर्लक्ष करणार्‍या केंद्र सरकारला जनता उत्तर देईल, असेही तपासे म्हणाले.

टॅग्स :राज ठाकरेभाजपाशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस