मुंबई-
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आता तयारीला लागले आहेत. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) देखील कंबर कसली आहे. नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत निवडणुकीसंदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीत मनसे महापालिका निवडणुकीला स्वबळावर सामोरं जाणार असल्याचा निर्धार केल्याची माहिती समोर आली होती. आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी त्यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी पक्षाचे नेते मंडळी, सरचिटणीस, पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यात आगामी महापालिका निवडणुकीत प्रत्यक्षात जाऊन काम करण्याच्या सुचना राज ठाकरेंनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
महापालिका निवडणुकीत 'किंग मेकर' बनण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. कारण आम्ही 'किंग' बनणार आहोत, असा विश्वासही यावेळी बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला आहे. महापालिका निवडणुकीआधी होणाऱ्या प्रभाग पुनर्रचना आणि त्यात ज्या काही सूचना असतील त्या सर्वांनी द्याव्यात असंही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सूचनांवर चर्चा केली जाईल, असंही नांदगावकर म्हणाले.
मुंबईवर जास्त चर्चा नाहीशिवतीर्थवर झालेल्या आजच्या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीबाबत जास्त चर्चा झालेली नसल्याचंही नांदगावकरांनी सांगितलं. "आज मुंबईसोडून पुणे, नाशिक आणि इतर महापालिकांबाबत चर्चा झाली. प्रत्येकाला स्वत:चा अहवाल देण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी केल्या आहेत. प्रत्येक समितीमध्ये तीन ते चार सदस्य नेमले आहेत", अशी माहिती नांदगावकरांनी दिली.
राज ठाकरेंचा दौरा ठरलेला नाहीराज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत विचारण्यात आलं असता अद्याप त्यांचा दौरा निश्चित करण्यात आलेला नसल्याचं नांदगावकर यांनी सांगितलं. स्थानिक पातळीवर आमच्या पक्षाच्या बैठका सुरू आहेत. आम्ही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देत आहोत. आरोप-प्रत्यारोप होत राहतात. निवडणुकीत आम्ही किंग मेकर नव्हे, किंग बनणार आहोत. ज्यांना कुणाला सोबत घ्यायचं ते पक्षाचे अध्यक्ष बघतील. आम्ही कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहोत, असं नांदगावकर यांनी सांगितलं.