मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाल्यानंतर त्यांच्या आदेशान्वये मनसैनिकांनी 4 तारखेपासून भोंगे लावून हनुमान चालिसा वाजवायला सुरुवात केली आहे. याप्रकरणी, पोलिसांनी धरपकड मोहिम हाती घेत अनेक मनसैनिकांना ताब्यात घेतलं. तत्पूर्वी पोलिसांनी मुंबईसह राज्यभरातील अनेक मनसे कार्यकर्त्यांना नोटीसही बजावली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या महिला नेत्या दिपाली सय्यद यांनी मनसेला सवाला केला आहे. राजुपत्र अमित ठाकरें आता कुठं लपून बसले, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेसाठी मनसैनिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली होती. राज ठाकरेंअगोदर त्यांचे सुपुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे औरंगाबादमध्ये पोहोचले होते. अमित ठाकरेंनी सभास्थळाला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी, माध्यमांशी बोलताना त्यांनी महत्वाचं विधान केलं होतं. वेळप्रसंगी केसेस अंगावर घ्यायला तयार असल्याचं अमित यांनी म्हटलं होतं. अमित यांच्या याच विधानाचा धागा पकडत शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी मनसेला सवाल केला आहे.
मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस आल्यानंतर अमित ठाकरेंनी दयेचा अर्ज केला का, वेळ आल्यावर अंगावर केसेस घेऊ म्हणणारे अमित ठाकरे आता लपले कुठे? असा सवाल दिपाली सय्यद यांनी मनसेला विचारला आहे. दरम्यान, पोलिसांनी मनसेंच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आमच्या आंदोलनामुळे 90 टक्के मशिदींवरील भोंगे उतरवण्यात आल्याचे सांगितले. तसेच, हे आंदोलन भोंगे उतरवेपर्यंत सुरुच राहिल, असेही त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते अमित ठाकरे
राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळालेली असली तरी पोलिसांकडून अनेक अटी आणि नियम घालून देण्यात आल्या आहेत. एवढ्या मोठ्या सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या आवाजाच्या ७५ डेसिबलच्या मर्यादेचं पालन कसं होणार? असं विचारलं असता अमित ठाकरे यांनी आम्ही राज ठाकरेंचे सैनिक आहोत आणि अंगावर केसेस दाखल करुन घ्यायला तयार आहोत, असं ते म्हणाले होते.