राज ठाकरे निवडणुकीबाबतची भूमिका मंगळवारी जाहीर करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 06:15 AM2019-03-17T06:15:24+5:302019-03-17T11:35:55+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका अध्यक्ष राज ठाकरे १९ मार्चला कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर करणार आहेत.
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका अध्यक्ष राज ठाकरे १९ मार्चला कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर करणार आहेत.
मनसेला महाआघाडीत घेण्याची राष्ट्रवादीची इच्छा होती, पण काँग्रेसचा विरोध होता. त्यातच मनसेचा डोळा असलेल्या ईशान्य मुंबई, कल्याणमध्ये राष्ट्रवादीने उमेदवारही जाहीर केले. त्यामुळे मनसे महाआघाडीत जाण्याची शक्यता संपुष्टात आली.
मनसे लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता कमीच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र व राज्य सरकारवर राज हे सडकून टीका करीत आले आहेत. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना विरोधी शक्तींना मदत करण्याची त्यांची भूमिका असेल, असे मानले जात आहे. विशेषत: राष्ट्रवादीच्या उमेदवारांना ते पाठिंबा देऊ शकतात. २०१४मध्ये मनसेने लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविली होती. पक्षाचा एकही खासदार निवडून येऊ शकला नाही. पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधून शरद सोनवणे हे एकमेव
आमदार निवडून आले होते. सोनवणे यांनी अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केला.