Join us

Raj Thackeray: बेगडी धर्मनिरपेक्षवादी शरद पवारांचं ऐकणार का?, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2022 8:20 PM

राज ठाकरेंनी रात्री 8 च्या सुमारास ट्विट करुन 4 मेसंदर्भात भूमिका मांडली

मुंबई - औरंगाबादमधील सभेवरून राज्यातील वातावरण ईदच्या संध्येला तापू लागले आहे. औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल केला आहे. १२ अटींचे उल्लंघन केल्याने सभेचे आयोजक राजीव जावळीकर आणि राज ठाकरे यांच्या विरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर मनसेचे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे पोलीस फौजफाटादेखील वाढला आहे. राज ठाकरेंनी सोमवारी केलेल्या ट्विटनंतर आता मंगळवारी पुन्हा एकदा भूमिका मांडली आहे.

राज ठाकरेंनी रात्री 8 च्या सुमारास ट्विट करुन 4 मेसंदर्भात भूमिका मांडली. राज यांनी 3 पानी पत्र लिहून देशातील हिंदू बांधवांना आवाहन केलं आहे. त्यामध्ये, मशिदींवरचे भोंगे ४ मेपर्यंत उतरवा, असे आम्ही सरकारला आधीच सांगितलं होतं. परंतु याबाबत सरकारची भूमिका बोटचेपेपणाची आहे, असे राज यांनी म्हटले आहे. तर, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केलं आहे.  महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की, कै. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत" हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे, असे म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा शरद पवारांना लक्ष्य केलं आहे. राज यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंवरही आपल्या पत्रातून निशाणा साधला आहे. 

आता नाही तर कधीच नाही

देशात इतकी कारागृहं नाहीत की देशातल्या तमाम हिंदूंना कारागृहात डांबणे सरकारला शक्य होईल! हेसुद्धा सर्व सरकारांनी लक्षात घ्यावे. माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भोंगे हटवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बंधनं झुगारून एकत्र या, आता नाही, तर कधीच नाही, असेही राज यांनी पत्रातून म्हटलं आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय सांगतो

देशातल्या राज्य सरकारांतला प्रत्येकजण सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देतोय. धर्माच्या नावाखाली वयोवृद्ध, रुग्ण, अशक्त व्यक्ती, लहान मुले, विद्यार्थी यांना भोंग्यांच्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे, त्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे की “रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत कुणालाही ध्वनिक्षेपक वापरता येणार नाही. प्रत्येक धर्मियांच्या सणांना तेवढ्याच दिवसांपुरती ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी मिळेल, परंतु ३६५ दिवस परवानगी मिळणार नाही. ध्वनिक्षेपकासाठीची परवानगी ही रोज घ्यावी लागेल.", असे राज यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :शरद पवारराज ठाकरेमनसेउद्धव ठाकरे